: पालकांची संमती देण्यास नकार
पाटण : जिवती तालुक्यातील पाटण येथील शासकीय आश्रमशाळेत पालकांनी आपल्या पाल्यांना कोरोनामुळे पाठविण्यास नकार दिल्याने विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारातच सापडले आहे.
शिक्षक गावोगावी जाऊन पालकांशी संवाद साधत आहेत. मात्र त्यांना पालक नकार देत आहेत. शिक्षकांनी ३० ते ३२ गावात जाऊन पालकांची भेट घेतली असता शिक्षकांना यश आले नाही. दहावीची परीक्षा जवळच आली आहे. पाटण आश्रमशाळेत ८३ विद्यार्थ्यांनी दहावीचे फार्म भरले आहे. कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्याने गेल्यावर्षी मार्च महिन्यात सर्व निवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना गावी पाठविण्यात आले होते. यावर्षीचे शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर काही भागात ऑनलाईन क्लासेस घेण्याचे सत्र ही सुरू झाले. पण ग्रामीण आणि दुर्गम भागात पालकांकडे स्मार्ट फोनचा अभाव असल्याने हे क्लासेस यशस्वी होऊ शकले नाही. दरम्यान कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शासनाच्या आदेशानुसार ९ वी ते १२ वी व ५ वी ते १०वी विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यात आले. पण कोरोना पुन्हा वाढत असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळेत कोरोनाचे सर्व नियम पाळत शिक्षण शिकवले जात आहे. पण हे करताना शिक्षकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
कोट
शाळेत पालकांच्या संमतीपत्राशिवाय प्रवेश घेता येणार नाही, असे आदिवासी विकास विभाग यांचे आदेश आहे पालकांनी संमती देऊन मुलांना शाळेत पाठवावे. शाळेत सॅनिटायझर व हॅण्ड वाॅश उपलब्ध आहे. मुलांची विशेष काळजी घेतली जाते.
-वासुदेव राजपुरोहित, मुख्याध्यापक आश्रमशाळा पाटण.