चिमूर : कोरोनापासून संरक्षण व्हावे यासाठी सरकारने लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. सध्या कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसी देण्यात येत आहेत. दिवसाला विविध केंद्रांवर किमान हजारच्या वर लसींचे डोस देण्यात येत असून आतापर्यंत तालुक्यात २७ टक्के नागरिकांनी पहिला आणि दुसरा डोस घेत कोरोनाचे सुरक्षा कवच घेतले आहे.
चिमुर तालुक्यात एकूण एक लाख १७ हजार २६८ कोरोना लसीचे लाभार्थी असून या नागरिकांना चिमूर शहरासह तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्र तथा उपकेंद्रावर लस देण्यात येत आहे. २ सप्टेंबरपर्यंत तालुक्यातील १८ वर्षावरील तब्बल ३२ हजार २८१ नागरिकांनी लस घेतली आहे. सध्या योग्य प्रमाणात लसींचा पुरवठा होत असल्याने लसीकरणाला वेग आला आहे.
तालुक्यातील सुमारे एक लाख १७ हजार २६८ नागरिकांना लसींचा डोस देण्याचे नियोजन आहे. सुरुवातीला फ्रंट लाईन वर्कर, आरोग्य सेवक यांना लस देण्यात येत होती. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली. त्यानंतर आता १८ वर्षांवरील नागरिकांनाही लस देण्यात येत आहे. सध्या तालुक्यासाठी कोविशिल्ड आणि कोव्हेंक्सिन लसींचा पुरवठा होत आहे. सुरुवातीला मागणी करूनही लसींचा पुरवठा होत नव्हता, आता मात्र तशी स्थिती दिसून येत नाही. त्यामुळे तालुक्यात कोरोनाची लस घेणाऱ्याच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे.
बॉक्स
या गावात आजही अल्प प्रतिसाद
चिमूर तालुक्यातील १६१ गावापैकी पिंपळगाव, नवतळा, तिरखुरा, डोंगरला, हेटी (बोडधा), पांढरपवनी, पिटीचुआ, शिवरा, विहीरगाव व करबडा या गावात आजही लसीबाबत वेगवेगळे गैरसमज आहेत. त्यामुळे या गावात लसीकरणाला नागरिक प्रतिसाद देत नाहीत.