गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह : १३ हजार विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा चंद्र्रपूर : राज्य शासनाने फेब्रुवारी महिन्यामध्ये बीएड, डीएड पात्रताधरक विद्यार्थ्यांची शिक्षक पात्रता परीक्षा घेतली. या परीक्षेमध्ये १३ हजारावर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.मात्र यातील केवळ ४२१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शिक्षण विभागातून प्रमाणपत्र वितरण सुरु करण्यात आले आहे.दिवसेंदिवस बेरोजगारांच्या संख्येने मोठ्या संख्येने वाढ होत आहे. बीएड, डीएड करणाऱ्याची संख्या पूर्वी मोठी होती. अनेकांनी लाखो रुपये भरून डीएड, बीएडसुद्धा केले. एवढे सर्व करून शिक्षकाची नोकरी मिळविण्यासाठी मोठी धडपड करावी लागत आहे. त्यातच राज्य शासनाने बीएड, डीएड पात्रताधारकांची पात्रता परीक्षा घेतली. या पात्रता परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यास शासन आपल्याला नोकरी देतील, अशी या बेरोजगारांनी आशा होती. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल १३ हजारावर उमेदवारांनी पात्रता परीक्षेसाठी अर्ज दाखल केले. विशेष म्हणजे, इतर स्पर्धा परीक्षेच्या तुलनेत या परीक्षेच्या अर्ज भरण्यासाठी परीक्षा शुल्कसुद्धा जास्त होते. तरीही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करून पात्रता परीक्षा दिली. मात्र यात विद्यार्थ्यांची बुद्धीमत्ता कमजोर ठरली. जिल्ह्यातील १३ हजारावर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असली तरी, केवळ ४२१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामुळे आता या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले, त्यांनाही नोकरीची हमी नाही. त्यामुळे उत्तीर्ण विद्यार्थीसुद्धा संभ्रामावस्थेत आहे. (नगर प्रतिनिधी)
शिक्षक पात्रता परीक्षेत केवळ ४२१ विद्यार्थी पात्र
By admin | Published: June 25, 2014 11:40 PM