लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना लसीकरणाला वेग देण्यासाठी ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षावरील व्याधीग्रस्त नागरिकांना लसीकरण करण्याच्या मोहिमेला सोमवारपासून प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी ५० पुरुष व २४ महिलांना लसीकरण करण्यात आले. मात्र अनेकांना नोंदणी करण्यास अडचणी आल्याची ओरड होत आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने पहिल्या टप्प्यात डॉक्टर, परिचारिका, पोलीस, सरकारी कर्मचारी अशा फ्रटलाईन योद्धांना लस दिली. परंतु, ज्येष्ठ व्यक्ती व व्याधीग्रस्त नागरिकांना कोरोनाची अधिक भीती आहे. त्यामुळे ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षावरील ब्लडप्रेशर, शुगर अशा १६ प्रकारच्या व्याधी असणाऱ्या नागरिकांना कोरोना लस देण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला. यासाठी आरोग्य विभागातर्फे कोविड डॉट जीआव्ही डॉट इन ही वेबसाईट सुरु केली. तसेच आरोग्य विभागाच्या ॲपवरसुद्धा नोंदणी करण्यात येत होती. यावर नोंदणी करणाऱ्यांना लस देण्यात येणार होती. या वेबसाईटवर आतापर्यंत अनेकांनी नोंदणी केली. त्यापैकी पहिल्या दिवशी ७४ जणांना लस देण्यात आली. यामध्ये ५० पुरुष तर २४ महिलांचा सहभाग आहे.
ॲप अपडेट झाल्याने अडचणपूर्वी आरोग्य विभागाच्या कोविन ॲपवर लसीकरणासाठी नोंदणी करता येत होती. परंतु, मागील दोन दिवसांपासून हे ॲप बंद होते. त्यामुळे नोंदणी करण्यास मोठी अडचण जात होती. त्यानंतर १ मार्च रोजी हे ॲप अपडेट करुन कोविन टू पाईंट झिरो नावाचे ॲप सुरु करण्यात आले. या ॲपमध्ये नवीन फिचर्स सहभागी करण्यात आले आहे. यामध्ये नोंदणी करताना स्वत:सह आपल्या कुटुंबातील तीन जणांची नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे अनेकांनी अडचण निर्माण झाली होती. परिणामी नोंदणी कमी झाली.