लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : ऐन उन्हाळ्यात जीवन प्राधिकरणच्या नवीन पाणीपुरवठा योजनेला पाईपलाईन जोडण्याचे काम सुरू असल्याने शहरातील ३२ वॉर्डातील पुरवठा ठप्प झाला. पिण्याचे पाणीच मिळत नसल्याने नागरिकांची भटकंती सुरू झाली. नगरपरिषदेकडून केवळ तीन टँकरने काही वॉर्डात पाणीपुरवठा केला आहे. उर्वरित वॉर्डातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शहरात उन्हाचा पारा भडकला. वर्धा नदीच्या पाण्याची पातळी खालावली. वर्धा नदीवरील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या विहिरीला पाणी पोहचत नाही. त्यामुळे प्राधिकरणाने शनिवारपासून नवीन योजनेला पाईपलाईन जोडणे सुरू केले आहे. यामुळे शहरातील पाणीपुरवठा ठप झाला आहे.१ मेपर्यंत बंद राहण्याची सूचना जीवन प्राधिकरणाने नळग्राहकांना दिली. नवीन पाईप जोडण्याचे काम अत्यंत वेगाने करीत असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपविभागीय अभियंता सतीश गोर्लावार यांनी दिली. शहरातील आपत्कालीन पाणी टंचाई निर्माण झालेली पाहून नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विशाल वाघ यांनी तीन पाणी टँकरची व्यवस्था केली. पण, टँकरद्वारे शहरातील ३२ वॉर्डात पाणीपुरवठा अशक्य झाले आहे.
बल्लारपूर शहरातील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची अडचण होऊ नये म्हणून सध्या तीन टँकरने पाणी पुरवठा केल्या जात आहे. नळ योजनेचे काम लवकरच पूर्ण होईल. नागरिकांना पाण्याची सोय व्हावी या दृष्टीने नगर परिषद प्रशासनाकडून पूर्ण प्रयत्न केले जात आहेत.- विशाल वाघ, मुख्याधिकारी नगरपरिषद, बल्लारपूर
बल्लारपुरातील जनता शुद्ध पाण्यासाठी महाराष्ट्र जीवनप्राधिकरण भरवशावर आहे. पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे पाण्याची कॅन घेण्यासाठी दुकानात गर्दी होत आहे. नागरिकांची गरज लक्षात घेऊन नगरपरिषदेने पाणीपुरवठ्यासाठी टँकरची संख्या वाढवावी.- सागर राऊत, माजी नगरसेवक, बल्लारपूर
नागभीडलाही पाणीटंचाई झळा
घनश्याम नवघडेलोकमत न्यूज नेटवर्क: नागभीड शहरालाही पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने तीन टँकरने पाणीपुरवठा सुरू केला. मात्र, अनेकांना पाणी मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
नागभीड शहराला तपाळ योजनेद्वारा पुरवठा होतो. ही योजना १९९९ मध्ये कार्यान्वित झाली. पण या योजनेत दोषांमुळे शहराला पाण्याची गरज पूर्ण करू शकत नाही.
वर्षातून अनेकदा ही योजना विविध कारणांमुळे बंद पडते. आता तर या योजनेतून एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून नगर परिषद व नगर परिषदेत समाविष्ट इतर गावांसाठी ३८ कोटी रुपये किमतीची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. योजनेचे काम पूर्ण झाले. पण, घोडे कुठे अडले हे कळेनासे झाले आहे.
सध्या शहरात काही भागांत पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू आहे. तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. टँकरचीसंख्या पुन्हा वाढविण्यात येईल.- उमेश शेंडे, अभियंता, पाणीपुरवठा विभाग, न. प. नागभीड