लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य सरकारने महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी जाहीर केलेल्या 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरण्यास महिलांनी सोमवार (दि. १) पासून सेतू केंद्र व तहसील कार्यालयात तोबा गर्दी केली. दरम्यान, आज शासनाने अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर अन्य प्रमाणपत्र ग्राह्य धरण्याचे जाहीर केल्याने दिलासा मिळाला. मंगळवारी दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात दोन अर्ज दाखल झाले आहेत.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळावा म्हणून जिल्ह्यातील शेकडो महिलांनी आज सेतू केंद्रांमध्ये प्रमाणपत्र काढण्यास दाखल झाल्या. त्यामुळे या केंद्रांमध्ये मोठी गर्दी दिसून आली. उत्पन्न व अधिवास प्रमाणपत्र काढण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच तहसील कार्यालयात महिलांची गर्दी आढळली. विविध कागदपत्रे घेऊन या योजनेबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे चौकशी करीत असल्याचे चित्र दिसून आले. वरोरा, भद्रावती, राजुरा, बल्लारपूर, मूल, सावली, चिमूर, ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, गोंडपिपरी, तालुका कार्यालय आणि सेतू केंद्रामध्ये उभे राहायलाही जागा नव्हती. शासनाने ठरवलेल्या मुदतीत अर्ज सादर केले नाही तर योजनेपासून वंचित राहू याची धास्ती महिलांच्या चेहऱ्यावर दिसत होती.
अशा आहेत नवीन अटी• योजनेत अर्ज करण्याची मुदत १ते १५ जुलै २०२४ पर्यंत होती. आता ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना १ जुलै २०२४ पासून दरमहा १५०० आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. आता अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी १५ वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला यापैकी कोणते ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहेत.
• योजनेतून पाच एकर शेतीची अट वगळली लाभार्थी महिलांचा वयोगट २१ ते ६० वर्ष वयोगट ऐवजी २१ ते ६५ वर्षे वयोगट करण्यात आला. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर पतीचा जन्म दाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. २.५ लाख उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात आली.
अडचणींसाठी येथे करा संपर्कअर्ज भरताना येणाऱ्या अडचणींचा निपटारा करण्यासाठी प्रशासनाने जिल्हास्थळी सुविधा केंद्र स्थापन केले. त्यासाठी नागरिकांनी ७९७२०५९२७४ तसेच महिला हेल्पलाईन १८१ वर संपर्क साधावा.
अर्जासाठी लागणारे उत्पन्न व रहिवासी प्रमाणपत्रे तयार करण्यासाठी विविध पातळीवर नगरपालिका मुख्याधिकारी, मनपा अधिकारी व तहसीलदारांकडून शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. यातून अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिकाधिक सुलभ करण्याच्या सूचना दिल्या. - विनय गौडा, जी. सी. जिल्हाधिकारी