जिल्ह्यात धान लागवडीचे क्षेत्र सर्वात मोठे आहे; मात्र मागील पाच वर्षांपासून कापूस, सोयाबीन, तूर व कडधान्य लागवडीचे क्षेत्र वाढले. शेतकरी आता पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला लागला आहे. बियाणे, खत व अन्य खर्चासाठी त्यांना पैशाची गरज आहे. अनेक शेतकरी हंगाम जवळ आल्यानंतरच धान्य विक्रीला बाजारात आणतात. सरकारने कोरोना प्रतिबंधासाठी जीवनावश्यक बाबींचा अपवाद वगळून निर्बंध घातले. पण, जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्य खरेदी सुरू ठेवण्याच्या सूचना पणन महासंघाने दिल्या होत्या. त्यामुळे कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करून धान्य खरेदी केली जात आहे. मूल येथील कृषी उत्पन्न बाजारात धानाची सर्वाधिक आवक आहे. संचालक मंडळाने शेतकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतल्याने दरदिवशी सुमारे दीड हजार क्विंटलपेक्षा जास्त धान खरेदी केली जात आहे. चंद्रपूर येथील बाजार समितीत निर्बंधाच्या सुरुवातीला धान्य आवक कमी होती. कोरोनाबाबत खबरदारी बाळगल्याने आता धान्याची आवक वाढली. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून धान्य खरेदी केली जात आहे. कठीण काळात बाजार समितीचे कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे शासनाने विमा लागू करण्याची मागणीही केली आहे.
बाजार समितीचे सचिव म्हणतात...
मूल तालुक्यात धान उत्पादकांची संख्या मोठी आहे. शेतकरी आता खरीप हंगामाच्या तयारीला लागला. त्यामुळे धान विक्रीसाठी बाजार समितीत येत आहेत. धानाच्या दरात चांगली वाढ झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष काळजी घेऊन धान खरेदी सुरू आहे.
-चतूर मोहुर्ले, सचिव, बाजार समिती मूल
चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत धान्याची आवक वाढली. शेतकऱ्यांच्या अडचणींचेही तातडीने निराकरण केले जात आहे. सुरुवातीला आवक कमी होती. पण आता वाढत आहे. बाजार समितीमधील सर्वांच्या आरोग्याची काळजी घेऊन दैनंदिन खरेदी केली जात आहे.
-संजय पावडे, सचिव, बाजार समिती, चंद्रपूर
शेतकरी व नागरिक म्हणतात...
शेतीसाठी आता पैशाची तरतूद करणे गरजेचे आहे. चांगला भाव मिळावा, म्हणून धान्य राखून ठेवले होते. खुल्या बाजारात धान्य विकण्यापेक्षा बाजार समितीत विकणे चांगले. शेतकऱ्यांनी हाच पर्याय स्वीकारला पाहिजे.
-शंकर तिमांडे, मूल
शेतीचा हंगाम लवकरच सुरू होणार आहे. पैशाची व्यवस्था केली नाही तर अडचणी येऊ शकतात. बँकेकडून खरीप कर्ज मिळण्यास उशीर होत आहे. अशावेळी घरी साठवून ठेवलेल्या धान्यामुळे मोठी मदत मिळणार आहे.
-गंगाधर शेंडे, चंद्रपूर