लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसांपासून उन्हामुळे अंगाची लाही-लाही होत आहे. त्यातच कोरोनाचे संकटही डोक्यावर आहे. त्यामुळे शेतकरी यावर्षी विविध दुष्टचक्रात सापडला आहे. सर्व संकटाकडे दुर्लक्ष करून शेतकरी पुन्हा शेतीमशागतीला लागला असून रविवारपासून रोहिनी नक्षत्राला प्रारंभ झाल्यामुळे आता तो पावसाच्या प्रतीक्षेत आहे.यावर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. अवकाळी पावसाने चार ते पाच वेळा वेळा अक्षरश: झोडपून काढले. यामुळे कापुस उत्पादकांसह सोयाबीन आणि धान उत्पादकांचेही मोठे नुकसान झाले. त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे शेतकºयांना आपल्याकडील शेतमाल विकता सुद्धा आला नाही. लॉकडाऊनमुळे शेती कामांवरही काही प्रमाणात विपरित परिणाम झाला. असे असतानाही शेतकऱ्यांनी शेती कामे सुरू केली आहे. सध्या अंतीम टप्प्यातील कामात शेतकरी व्यस्त आहे. वाढत्या उन्हामुळे अंगाची लाही-लाही होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांनाच पाऊस बरसण्याचे वेध लागले आहेत. रविवारी उत्तररात्री रोहिनी नक्षत्राला प्रारंभ झाला आहे. ७ जूनपासून मृग नक्षत्राला प्रारंभ होईल. त्यामुळे आता राजुरा, कोरपना परिसरात काही भागात कपाशीच्या पेरणीसाठी जमिन तयार केली जात आहे. यंदा सर्वत्र चांगला पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यातील तज्ज्ञांनी व्यक्त केला असून पेरणीयोग्य पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.चांगल्या पावसाची शक्यतायंदा मृग, आर्द्रा, पुष्प, पुनर्वसू, आश्लेषा, मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा, हस्त, स्वाती या सर्वच नक्षत्रांवर पाऊस चांगल होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्प, आश्लेषा, मघा, उत्तरा, हस्त, चित्रा आणि स्वाती ही पावसाची नक्षत्रे आहेत. हजारो वर्षापासून शेतकरी पावसाच्या या बारा नक्षत्रावरुनच पीकपाण्याचा अंदाज घेतो. आजही परंपरा कायम आहे. शेती आणि शेतकरी यांच्या जीवनात आजही या पावसाच्या नक्षत्रांना मोठे महत्त्व आहे. रोहिणी नक्षत्राच्या पावसाने पेरणीपूर्वी तण उगवून त्यांचा नाश करणे सोईचे होते. परिणामी खरीप पिकांच्या उत्पादन क्षमतेत वाढ होते. याशिवाय रोहिणी नक्षत्राच्या पावसाने हवेतील नत्राचे जमिनीत स्थिरीकरण होते. बियाण्यांची दमदार उगवण होवून जमिनीबाहेर आलेल्या पिकाची जोरदार वाढ होते.
रोहिणीच्या प्रारंभामुळे शेतकऱ्यांना आता पावसाचे वेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 5:00 AM
वर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. अवकाळी पावसाने चार ते पाच वेळा वेळा अक्षरश: झोडपून काढले. यामुळे कापुस उत्पादकांसह सोयाबीन आणि धान उत्पादकांचेही मोठे नुकसान झाले. त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे शेतकºयांना आपल्याकडील शेतमाल विकता सुद्धा आला नाही. लॉकडाऊनमुळे शेती कामांवरही काही प्रमाणात विपरित परिणाम झाला.
ठळक मुद्देकामे अंतिम टप्प्यात : गावागावात बी-बियाणांची जुळवाजुळव सुरू