चंद्रपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर एप्रिल महिन्यापासून राज्य सरकारने काही निर्बंध लादले. सद्यस्थितीत रुग्णसंख्या घटल्यामुळे व्यवहार सुरळीत सुरू झाले असून नियम शिथिल करण्यात आले आहेत. मात्र मंदिर अद्यापही बंद असल्याने भाविकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. श्रावण महिना सणासुदीचा असतो. या महिन्यात तरी मंदिरे सुरू होतील, अशी आशा सर्वांनाच लागली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बहुतांश निर्बंध राज्य सरकारने हटविले आहेत. आता हाॅटेल, दुकाने, बससेवा सर्व सुरू झाले आहे. बाजारपेठांमध्येही मोठ्या संख्येने गर्दी वाढत आहे. त्यामुळे कोरोना नियम पाळून मंदिर, प्रार्थना स्थळे सुरू करण्याची मागणी आता जोर धरत आहे. काही दिवसांपूर्वी दुपारी ४ वाजेपर्यंत बाजारपेठ सुरू ठेवल्या जात होत्या. १५ ऑगस्टपासून रात्री १० वाजेपर्यंत बाजारपेठ सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. श्रावण महिन्यात विविध सणांची रेलचेल असते. विशेषत: श्रावण सोमवारी बहुतांश जण पूजाअर्चना करतात. मात्र मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही मंदिर बंद असल्यामुळे भाविकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
बाॅक्स
भाविकांची निराशा
मागील वर्षी मंदिर बंद होते. त्यानंतर सलग दुसऱ्या वर्षीही मंदिरे बंद असल्यामुळे भाविकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. मंदिरांवर अनेकांची आर्थिक गणिते अवलंबून आहेत. फुले व इतर धार्मिक विधीसाठी साहित्य विकणारे दुकानदार या सर्वांचा व्यवसाय मंदिरावर अवलंबून आहे. मात्र मंदिर बंद असल्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
बाॅक्स
महाकाली मंदिरासह सर्वच बंद
जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या महाकाली मंदिरासह प्रत्येक मंदिर सद्यस्थितीत बंद आहे. विशेष म्हणजे, महाकाली देवीची यात्रा प्रसिद्ध आहे. ही यात्राही यावर्षी भरली नाही. त्यातच मंदिरही बंद असल्यामुळे भाविकांना मंदिराचे बाहेरूनच दर्शन घ्यावे लागत आहे.
बाॅक्स
अंचलेश्वर मंदिरही पडले ओस
चंद्रपूर येथील अंचलेश्वर मंदिरामध्ये श्रावण सोमवारी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत होते. बेलपात्र वाहून भाविक तासन् तास मंदिरामध्ये घालवित होते.
मात्र आता मंदिर बंद असल्यामुळे भाविकांना घरातून पूजाअर्चना करावी लागत आहे. पूजेच्या साहित्यातून होणारी आर्थिक उलाढालही जवळपास थांबली आहे. त्यामुळे यावर अवलंबून असलेल्यांचे मोठे नुकसान होत आहे.