चंद्रपूर : ‘मिशन ऑलिम्पिक २०३६’ हे ध्येय डोळ्यांपुढे चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुका क्रीडा संकुलात राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून होणाऱ्या ६७ व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचा भव्यदिव्य उद्घाटन सोहळा बुधवारी (दि.२७) विविध सांस्कृतिक मेजवानीने रंगणार आहे.
सायंकाळी ५:३०वाजता राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. शुभारंभ समारंभात फायर शो, लेझर शो, ॲक्रोबॅटिक डान्ससह विविध सांस्कृतिक कार्यक्रम मुख्य आकर्षण राहणार आहे. २७ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत बल्लारपूर येथे होणाऱ्या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताचे चंद्रपूर व बल्लारपूर नगरीचा चेहरामोहरा बदलला आहे. विविध चौकांचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. विविध संकल्पनावर आधारित रंगबेरंगी चित्रांनी भिंती फुलल्या आहेत. अखिल भारतीयस्तरावरील या स्पर्धेसाठी चंद्रपूरनगरी सज्ज झाली आहे.
शाल्मली खोलगडे गाणार ‘लाइव्ह’मुख्य उद्घाटन सोहळ्यात प्रसिद्ध सिनेगायिका शाल्मली खेालगडे यांचा लाइव्ह संगीत परफॉर्मन्स असणार आहे. यासोबतच फायर शो, लेझर शो, अक्रोबाईट डान्स आणि ढोल ताशांचा गजर करण्यात येणार आहे.
‘एक शाम खिलाडीयों के नाम’२८ डिसेंबरला सायंकाळी ६:३० वाजता गीत आणि नृत्याचा समावेश असलेल्या ‘एक शाम खिलाडीयों के नाम’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात पार्श्वगायक मोरेश्वर निस्ताने, श्रुती जैन (सूर नवा ध्यास नवा फेम), स्वस्तिका ठाकूर (कलर्स रायजिंग फेम) व सागर मधुमटके, संगीत संयोजन पंकज सिंग व नृत्य दिग्दर्शन सचिन डोंगरे हे कलाकार सहभागी होतील.
शिववंदना, महाराष्ट्राची लोकधाराही वेधणार लक्षमहाराष्ट्राच्या लोक संस्कृतीचे दर्शन घडविणारा, शिववंदना व महाराष्ट्राची लोकधारा हा सांस्कृतिक कार्यक्रम २९ डिसेंबरला सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. यात सुमारे ३०० लोककलावंत सहभागी होणार आहेत. महाराष्ट्राची विविध संस्कृतीचे दर्शन या कार्यक्रमातून घडेल. गणेशवंदना, जागर गोंधळ, शाहिरी, भक्ती-शक्ती संगम, कोळी नृत्य व शिवराज्यभिषेक सोहळ्याचे सादरीकरण यावेळी उपस्थिताना पाहता येईल.
‘कलर्स ऑफ इंडिया’चीही क्रेझ30 डिसेंबरला 350 कलाकार देशातील विविध राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील. भव्यदिव्य स्वरूपात होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी ‘थीम साँग’ तयार करण्यात आले आहे. या गाण्याला प्रसिद्ध पार्श्वगायक कैलाश खेर यांनी स्वर दिला आहे. ‘आओ चंद्रपूर, खेलो चंद्रपूर... खेलो ऐसा दिल लेलो चंद्रपूर...’ असे शब्द असलेले हे गीत विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाची पेरणी करणारे ठरत आहे. लक्षवेधक शब्द, जोशपूर्ण संगीत आणि कैलाश खेर यांचा भावगर्भित आवाज हे या ‘थीम साँग’ची वैशिष्ट्य ठरत आहे. प्रसिद्ध अभिनेते सलमान खान आणि आमिर खान यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा संदेश प्रसारीत केले आहेत.