नागभीड नगरपरिषदेतील प्रकार : काही काळ तणावाचे वातावरणनागभीड : नागभीड नगरपरिषद विरोधक आणि समर्थक एकमेकांसमोर आल्याने येथे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली. शेवटी प्रशासनाने समजूत घालून निर्माण झालेल्या परिस्थितीवर तोडगा काढला.११ एप्रिल रोजी नागभीड नगरपरिषदेची स्थापना करण्यात आली. या नगर परिषदेत आजूबाजूची आणखी नऊ गावे समाविष्ट करण्यात आली. यात बोथली, बाम्हणी, चिखलपरसोडी, तुकूम, भिकेश्वर, सुलेझरी, डोंगरगाव आदी गावांचा समावेश आहे. यातील सुलेझरी, चिखलपरसोडी ही गावे वगळता अन्य गावांचा नगर परिषदेत सहभागी होण्यास विरोध आहे. विरोध असणाऱ्या गावांनी गुरुवारी येथील आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांच्या कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले होते.सदर मोर्चा येथील प्रमुख मार्गाने येत असताना दुसऱ्या बाजूने नगर परिषद समर्थकही आपला मोर्चा घेऊन आले. हे दोन्ही मोर्चे येथील सिमेना टॉकीज चौकात आमने सामने आले. दोन्ही मोर्चे समोरासमोर आल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली. तहसीलदार समीर माने, ठाणेदार बी. डी.मडावी, तळोधीचे ठाणेदार व्ही. एस. सोनवणे हे मोर्चेकऱ्यांची समजूत घालीत होते. पण कोणीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. जवळपास एक तास ही गोंधळाची स्थिती होती.शेवटी नगर परिषद समर्थकांची समजूत काढण्यात प्रशासनाला यश आले आणि नगर परिषद विरोधकांचा मोर्चा समोर निघाला. यानंतर पोलीस ठाण्यासमोर या मोर्चालाही अडविण्यात आले. या ठिकाणी मोर्चा अडविण्यात आल्यानंतर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. मोर्चाचे नेतृत्व अॅड. पारोमिता गोस्वामी, अॅड. गोविंद भेंडारकर, प्रफुल्ल खापर्डे, दिनेश गावंडे, अमृत शेंडे, पुरुषोत्तम बगमारे, नानाजी माटे समदूर गेडाम यांनी केले.तर नगरपरिषद समर्थकांच्या मोर्चाचे नेतृत्व वसंत वारजूकर, अवेश पठाण, गणेश तर्वेकर, सचिन आकुलवार, संजय गजपुरे, नासीर शेख, विनय शेंडे, प्रदीप तर्वेकर यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)
विरोधक, समर्थक आमने-सामने
By admin | Published: June 03, 2016 12:51 AM