चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिल २०१५ पासून दारूबंदी करण्यात आली. चुनाळा येथील प्रवेशद्वारासमोरील विहीरगाव-धोनोरा मार्गावर असलेल्या ग्रामपंचायत, बँक, इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह, तिरुपती बालाजी मंदिर, बसस्थानकलगत बिअर बार आणि देशी दारूचे दुकान होते. दारूबंदीमुळे या परिसरात शांतता व सुव्यवस्था होती. दारूबंदी उठल्याने या ठिकाणी दारूचे दुकान सुरू होत आहे. यामुळे महिला व लहान बालकांपासून वयोवृद्ध नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे. रहदारीचे ठिकाण असल्यामुळे या दुकानांचा मनस्ताप सर्वांनाच सहन करावा लागणार आहे. भविष्यात दारू पिऊन गुंडप्रवृत्तीच्या लोकांकडून बँक, ग्रामपंचायत, पोस्ट ऑफिस, बसस्थानक, सहकारी सेवा संस्था येथे ये-जा करणाऱ्या नागरिकांसोबत अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, याकडे लक्ष वेधले आहे.
ही दुकाने चुनाळा गावाच्या प्रवेश द्वारासमोर विहीरगाव-धानोरा राज्य मार्गाच्या वळणावर आहे. दारू दुकानासमोर गर्दी राहत असल्याने वळण रस्त्यावर समोरील वाहन ये-जा करीत असताना या अगोदर बरेचदा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी बसची वाट पाहत बसस्थानकावर उभे असतात. यामुळे या ठिकाणी दारू दुकान सुरू करणे धोक्याचे असून, अपघाताला आमंत्रण देणारे आहे. तेव्हा तत्काळ या ठिकाणावरून बिअर बार व देशी दारूची दुकाने दुसऱ्या ठिकाणी हलविण्याची मागणी चुनाळा येथील शेकडो महिलांनी स्वाक्षरीचे निवेदन राजुरा तहसीलदार हरीश गाडे यांच्याकडे देत जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. यावेळी निवेदन देताना चुनाळा येथील लक्ष्मी दुर्गे, सुनीता किरमिरवार, निर्मला कार्लेकर, वर्षा रागीट, वंदना रागीट, इंदू गौरकार, पुष्पा तेलंग, स्वाती तेलंग, मीना कार्लेकर, संगीता रागीट उपस्थित होत्या.
===Photopath===
150621\img-20210615-wa0012.jpg
===Caption===
तहसीलदार यांना निवेदन देताना चुनाळा येथील महीला