काँग्रेससह विरोधी नगरसेवकांना महापालिकेत येण्यास मज्जाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2021 05:00 AM2021-09-01T05:00:00+5:302021-09-01T05:00:35+5:30

गटनेता निवडण्यासाठी भाजप व मित्र पक्षातील नगरसेवकांच्या स्टॅम्पवर स्वाक्षऱ्याही घेण्यात आल्या. परिणामी, विरोधकांऐवजी भाजपातील अतंर्गत वाद राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला. अशातच मंगळवारी ऑनलाईन आमसभेदरम्यान महापौर व आयुक्तांनी मनपाच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावल्याने महापौर व आयुक्तांच्या मनमानी कारभाराचा अतिरेक झाल्याचा आरोप काँग्रेसच्या नगरसेवकांनी केला आहे.

Opposition corporators including Congress are not allowed to come to the Municipal Corporation | काँग्रेससह विरोधी नगरसेवकांना महापालिकेत येण्यास मज्जाव

काँग्रेससह विरोधी नगरसेवकांना महापालिकेत येण्यास मज्जाव

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : स्थायी समितीमधून निवृत्त झाल्यानंतरही कंत्राटदारांची देयके मंजूर करण्यासाठी बेकायदेशीर सभा बोलविण्याचा माजी सभापतींचा प्रयत्न सोमवारी अंगलट आला असतानाच मनपातील भाजप सत्ताधाऱ्यांनी नवाच विक्रम प्रस्थापित केला. विरोधी पक्षातील निमंत्रितांनी सभेत प्रत्यक्षात उपस्थितच राहू नये, यासाठी थेट पोलिसांच्या मदतीने आतून कुलूप लावल्याचा आरोप काँग्रेससह विरोधी नगरसेवकांनी मंगळवारी आंदोलनादरम्यान केला.
चंद्रपूर मनपाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप आणि काँग्रेससह विरोधी नगरसेवकांमधील वाद उफाळू लागला आहे. गत आठवड्यात स्थायी समितीचे सभापती रवी आसवानी यांच्यासह आठ सदस्यांचा कालावधी संपला. या जागेवर सभापतींसह अन्य सात सदस्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. 
भाजपचे मनपातील गटनेते वसंता देशमुख यांना सभापतीपदासाठी डावलल्यापासून पक्षातच धुमश्चक्री सुरू आहे. संभाव्य सभापतीचे नाव गटनेत्यांनाच पाठविण्याचा सर्वस्वी अधिकार आहे. मात्र, स्थायी समितीच्या सभापतीची निवडणूक होण्यापूर्वीच भाजपच्या शिर्षस्थ नेत्यांनी देशमुख यांना गटनेते पदावरून हटविण्याचा निर्णय घेतला. 
गटनेता निवडण्यासाठी भाजप व मित्र पक्षातील नगरसेवकांच्या स्टॅम्पवर स्वाक्षऱ्याही घेण्यात आल्या. परिणामी, विरोधकांऐवजी भाजपातील अतंर्गत वाद राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला. अशातच मंगळवारी ऑनलाईन आमसभेदरम्यान महापौर व आयुक्तांनी मनपाच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावल्याने महापौर व आयुक्तांच्या मनमानी कारभाराचा अतिरेक झाल्याचा आरोप काँग्रेसच्या नगरसेवकांनी केला आहे.

कुणालाही रोखले नाही - महापौर राखी कंचर्लावार
कोविडच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन सभा घेतल्या जात आहेत. उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सर्व पक्षाचे गटनेते, विरोधी पक्षनेते व सभागृह नेते यांना आमसभेत प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची मुभा आहे. प्रवेशद्वाराला कुलूप लावून रोखण्याचा प्रश्नच येत नाही, असा दावा महापौर राखी कंचर्लावार यांनी केला आहे.

मनपात नेमके काय घडले?
मंगळवारी दुपारी १ वाजता आमसभा आयोजित केल्याची नोटीस सर्व पक्षाचे गटनेते तसेच विरोधी पक्षनेते व सभागृह नेते यांना देण्यात आली होती. काँग्रेससह विरोधी पक्षाचे नगरसेवक मनपासमोर गेले असता प्रवेशद्वाराला कुलूप ठोकल्याचे दिसून आले. शिवाय, मनपासमोर पोलीसही तैनात होते, असा आरोप काँग्रेसच्या नगरसेवकांनी केला आहे.

नर्सिंग होम्सच्या नुतनीकरणाला १० वर्षांची मुदतवाढ
शहरातील खासगी, नर्सिंग होम्सला नोंदणी व नुतनीकरण करण्यासाठी १० वर्षांची मुदतवाढ देण्याचा ठराव मंजूर केला. गांधी चौक पटांगण, सातमजली इमारत परिसर, महात्मा गांधी शाळेची जागा व ग्रेन मार्केट इत्यादी ठिकाणी कंत्राटी पद्धतीने पे-पार्कींग सुरू करण्याचा ठरावावरही शिक्कामोर्तब झाले.

महापौर व आयुक्तांविरूद्ध पोलिसात तक्रार
प्रवेशद्वाराला कुलूप लावल्याप्रकरणी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी महापौर राखी कंचर्लावार व आयुक्त राजेश मोहिते यांच्याविरूद्ध शहर ठाण्यात तक्रार केली. चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी देशमुख यांनी ठाणेदार सुधाकर आंभोरे यांच्याकडे केली आहे.

सत्ताधाऱ्यांविरूद्ध काँग्रेसचे साडेसाती सद्धबुद्धी आंदोलन
मनपा प्रवेशद्वाराला कुलूप लावल्याचे पाहून काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौरांविरूद्ध जोरदार घोषणाबाजी करीत शर्ट काढून साडेसाती सद्धबुद्धी आंदोलन केले. महापौर व आयुक्तांनी पोलीस बंदोबस्त लावून आमसभेसाठी आत येऊ दिले नाही, असा आरोप पप्पू देशमुख व अन्य नगरसेवकांनी केला. मनपाचा गैरव्यवहार चव्हाट्यावर आणणारे अनेक फलक लावल्याचेही आंदोलनस्थळी दिसून आले. आंदोलनात काँग्रेसचे गटनेते डॉ. सुरेश महाकुलकर, काँग्रेस कमिटीचे माजी शहर अध्यक्ष नंदू नागरकर, पप्पू देशमुख, अ. भा. काँग्रेस कमिटी सदस्य सुनीता लोढीया, देवेंद्र बेले, अशोक नागापुरे, अमजद अली, नीलेश खोब्रागडे, संगीता भोयर, ललिता रेवलीवर, कलामती यादव, शालिनी भगत, हरिश कोत्तावार, अरविंद मडावी, स्वाती त्रिवेदी, सागर वानखेडे, अनिता चापले, निखिल धनवलकर, सौरभ ठाेंबरे, राजेंंद्र अवघडे, कुमार स्वामी पोचलवार व कार्यकर्ते सहभागी झाले.

 

Web Title: Opposition corporators including Congress are not allowed to come to the Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.