चंद्रपूर : दोन दिवसांपूर्वी वरोरा नाका उड्डाणपूल येथून एका युवकास २२ ग्रॅम ब्राऊन शुगरसह अटक केली होती. या प्रकरणाचा तपास घेताना नागपूर येथील एका महिलेकडून ब्राऊन शुगर आणल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूर येथील चित्रा प्रदीपसिंग ठाकूर (३४, रा. इतवारी रेल्वे) या महिलेसह नरेन उर्फ बाली चिंतामण बोकडे (२०, रा. फुकटनगर, कावलापेठ, नागपूर) या दोघांना अटक केली आहे. चित्रा ठाकूर या महिलेवर नागपूर पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी दोघांना न्यायालयात हजर केले असता १४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
चंद्रपूर शहरात मोठ्या प्रमाणात ब्राऊन शुगरची तस्करी होत असल्याच्या तक्रारी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्याकडे आल्या होत्या. त्यामुळे त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना एनडीपीएस पथक तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे यांच्या नेतृत्वात पथक तयार केले. तेव्हापासून या पथकाने आम्ल पदार्थाच्या तस्करीवर लक्ष ठेवले होते. सोमवारी वरोरा नाका उड्डाणपूल येथे ब्राऊन शुगरची विक्री होणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी अजय सीताराम धुनीरवीदास यांच्याकडून स्कूल बॅगमधून २२ ग्राम ब्राऊन शुगर जप्त केले होते. त्याची कसून चौकशी केल्यानंतर नागपूर येथून ब्राऊन शुगर आणल्याची माहिती दिली. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नागपूरला जाऊन चित्रा ठाकूर व नरेन बोकडे याला अटक केली. दोघांनाही १४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ती महिला नाशिक, मुंबई येथून ब्राऊन शुगर आणत होती. त्या महिलेवर नागपूर शांतीनगर पोलीस स्टेशनमध्ये एनडीपीएस व दारूबंदीसंबंधित गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे यांच्या पथकाने केली.