भोजराज गोवर्धन
मूल : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जनजीवन विस्कळीत झाले. रुग्णांची एकेका बेडसाठी धावपळ होत होती. रुग्णाला ऑक्सिजन मिळत नव्हते. व्हेंटिलेटर तर दूरची गोष्ट होती. या अभावामुळे आणि वेळीच उपचार न मिळाल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला. आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. या लाटेसाठी मूल तालुका प्रशासन, नगर परिषद प्रशासन आणि आरोग्य विभाग काय तयारी करीत आहे, याचे रिॲलिटी चेक केेले तर या तीनही यंत्रणांना तिसऱ्या लाटेची जाणीव असल्याचे दिसून आले. परंतु आरोग्य यंत्रणा अपूर्ण नसल्याची बाब पुढे आली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तालुक्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. यामुळे मूल येथे तीन ठिकाणी कोरोना केअर सेंटर तयार करण्यात आले. त्या ठिकाणी चांगली आरोग्य सेवा मिळाल्याने अनेक रुग्ण कोरोनामुक्त झाले. रुग्णांची संख्या कमी झाल्याने मूल येथील एसएम लाॅनमधील कोरोना केअर सेंटर सद्य:स्थितीत बंद करण्यात आले आहे. उपजिल्हा रुग्णालय आणि नगरपालिकेच्या माॅडेल स्कूलमधील कोविड सेंटर सुरू आहे, त्या ठिकाणी ३७ रुग्ण उपचार घेत आहेत. लाॅकडाऊन लागल्यानंतर पहिल्या लाटेत मूल तालुक्यातील चिरोली येथे २१ मे २०२० रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर रुग्णांची संख्या वाढत गेली. पहिल्या लाटेदरम्यान मूल तालुक्यातील रुग्णांना चंद्रपूर येथे उपचारार्थ पाठविण्यात येत आहे. त्यानंतर काही दिवसांतच मूल येथील भाग्यरेखा सभागृहात कोरोना केअर सेंटर तालुका प्रशासनाने तयार केले. दुसऱ्या लाटेदरम्यान मूल येथे ३१५ बेडचे तीन ठिकाणी कोरोना केअर सेंटर उभारण्यात आले. २८ मेपर्यंत २३५ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. त्यापैकी १८७ रुग्ण गृहविलगीकरण, ३७ रुग्ण मूल येथील कोविड सेंटर तर ११ रुग्ण चंद्रपूर येथे उपचार घेत आहेत. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय मूल येथे ऑक्सिजन जनरेशन प्लांटला मंजुरी मिळाली आहे. त्यादृष्टीने कामालाही सुरुवात झाली आहे. येत्या दीड ते दोन महिन्यांत हा प्लांट पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न दिसत आहे. त्यासोबतच ५० ऑक्सिजन बेडच्या पाइपलाइनचे काम पूर्णत्वाकडे आहे. पंधरा दिवसांत सदर काम पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. उज्ज्वलकुमार इंदुरकर यांनी सांगितले. सद्य:स्थितीत ३५ ऑक्सिजन काॅन्सेन्ट्रेटर, १० मोठे आणि २० लहान सिलिंडरचा उपयोग उपजिल्हा रुग्णालयात केला जात आहे. तालुक्यात रॅपिड रिस्पाॅन्स टीम गठित करण्यात आली आहे.
पाच ठिकाणी अँटिजन तपासणी
मूल येथील पत्रकार भवनामध्ये अँटिजन तपासणी करण्यात येत आहे. त्यासोबत चिरोली, राजोली, मारोडा आणि बेंबाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात अँटिजन तपासणी केली जाते. सदर तपासणी अहवाल काही मिनिटांमध्ये रुग्णांना दिला जातो. तर पत्रकार भवन येथेच आरटीपीसीआर तपासणी करण्यासाठी स्वॅब घेऊन चंद्रपूरला पाठविले जाते. त्याचा अहवाल २४ तासांत रुग्णांना पाठविला जातो.
२०,९६९ रुग्णांची तपासणी
तालुक्यातील १३,२९३ रुग्णांची आरटीपीसीआर तर ७,४०३ रुग्णांची अँटिजन तपासणी करण्यात आली. यामध्ये २,६४३ रुग्ण आरटीपीसीआर तपासणीमध्ये बाधित निघाले. १०३५ रुग्ण अँटिजन तपासणीत बाधित निघाले. कोरोनाच्या पहिल्या लाटेत शहरी भागात ८७५ रुग्ण, ग्रामीण क्षेत्रात ६२८ बाधित निघाले. दुसऱ्या लाटेत शहरी भागात १,१८० आणि ग्रामीण क्षेत्रात ९९५ बाधित रुग्ण मिळाले. मूल तालुक्यात २८ मेपर्यंत २६ बाधितांचा मृत्यू झाला. यामध्ये १३ शहरातील आणि १३ ग्रामीण भागातील बाधित आहेत.
१८,९१९ नागरिकांचे लसीकरण
मूल तालुक्यातील राजोली, मारोडा, बेंबाळ आणि चिरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि काही उपकेंद्रांत लसीकरण करण्यात येत आहे. त्यासोबतच मूल येथील उपजिल्हा रुग्णालयातही ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केले जात असून १७,८४५ नागरिकांचे लसीकरण केले आहे. १८ वर्षांवरील १,०७४ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी प्रशासनाकडे पत्रव्यवहार
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता उपजिल्हा रुग्णालयात डाॅक्टर, परिचारिका आणि पुरेशा मनुष्यबळाची नियुक्ती करण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. औषधीसाठा आणि आवश्यक साहित्याचीही मागणी करण्यात आली आहे.
उपजिल्हा रुग्णालयातील तीन रुग्णवाहिकांतून रुग्णांना पोहोचविण्याचे काम केले जात आहे, प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन रुग्णवाहिका आणि १०८ चे वाहनही रुग्णांच्या मदतीला धावत आहे. क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून मूल येथील उपजिल्हा रुग्णालयाला दोन रुग्णवाहिका भेट देण्यात आली हे विशेष.
नागरिकांनी कोरोनाच्या त्रिसूत्रीचे पालन करावे - डाॅ. सुमेध खोब्रागडे
आरोग्य विभागाने नियमित सर्व्हे सुरू केला आहे, प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र आणि मूल येथील पत्रकार भवन येथे अँटिजन तपासणी सुरू केली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतील संभाव्य धोका लक्षात घेता, ग्रामीण भागातील नागरिकांना संस्थात्मक अलगीकरणामध्ये ठेवण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी शाळेत व्यवस्था करून ठेवली आहे. तालुक्यातील आरोग्य विभाग सज्ज आहे, नागरिकांनी कोरोनाच्या त्रिसूत्रीचे पालन करावे, कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. सुमेध खोब्रागडे यांनी केले आहे.