फोटो
घुग्घुस : परिसरातील उसगाव येथे महामिनरल माइनिंग अँड बेनिफिकेशन प्रा.लि.ची कोल वॉशरीज मागील चार महिन्यांपूर्वी सुरू झालेली आहे. मात्र स्थानिक वाहतूकदारांना कोळसा वाहतूक करू न देता विशिष्ट मर्जीतल्या ट्रान्स्पोर्टर मालकांना कोळसा वाहतुकीचे काम दिले आहे. यामुळे संतप्त स्थानिक वाहतूकदारांनी स्थानिक कोल वाॅशरीवर हल्लाबोल करून आठ दिवसात वाहतुकीचे काम न दिल्यास दीडशे वाहनाने कोल वाॅशरीला बेमुदत घेराव करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
मागील अनेक वर्षांपासून या परिसरातील विविध कोल वाॅशरीज बंद झाल्याने अनेक वाहतूकदारावर उपासमारीची वेळ आली. अनेकांची वाहने फायनन्स कंपनीने उचलून नेले तर काहींनी वाहन उभे केले. त्यामुळे दीडशेच्या वर स्थानिकांचे वाहने उभे आहे. त्याच्या ट्रान्स्पोर्टवर आधारित चालक व वाहक बेरोजगार झाले आहे. मागील चार महिन्यांपूर्वी येथील महामिनरल माइनिंग अँड बेनिफिकेशन प्रा.लि.(गुप्ता कोल वाशरी) सुरू झाली आहे. या कोलवाॅशरीने आपल्या मर्जीतील लोकांना कोळसा वाहतुकीचे काम दिले असून त्यांच्याकडून दुसऱ्या ट्रान्स्पोर्टरला कमी भावाने कोळसा वाहतूक करण्यास प्रवृत्त केल्या जात असल्याचा आरोप स्थानिक वाहतूकदारांनी केला आहे.
घुग्घुस परिसरातील दीडशे चालक मालकांनी घुग्घुस काँग्रेस अध्यक्ष राजू रेड्डी यांना आपल्यावर होत असलेल्या अन्याय व दडपशाहीची माहिती दिली असता गुरुवारी राजु रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली चालक मालकांनी वॉशरी कार्यालयात धडक दिली. शिष्टमंडळाने कोल वॉशरीजचे जनरल मॅनेजर प्रकाश राव, प्लांट हेड प्रशांत अतकरे, विशाल इंगळे, कमर्शियल मॅनेजर संजय सरागे यांच्याशी चर्चा करून चालक मालक यांना सरळ कोळसा वाहतुकीचे कंत्राट देण्याची मागणी करण्यात आली. याप्रसंगी काँग्रेस अध्यक्ष राजू रेड्डी, कामगार नेते सैय्यद अनवर, श्रीनिवास गोस्कुला, राकेश खोब्रागडे, ओमप्रकाश सिंग, मोसम शेख, रियाज अहमद, नुरूल सिद्दीकी, बालकिशन कुळसंगे, संपत कोंकटी उपस्थित होते.