सिंदेवाही : राज्यात आणि केंद्रात गेली पंधरा वर्षे कॉग्रेसचे सरकार होते. तरीही शिक्षण आणि सिंचनासारख्या क्षेत्रात बॅकलॉग सतत वाढत गेला. मात्र आमचे सरकार सत्तेत आल्यावर केवळ दोन वर्षातच काही प्रमाणत बॅकलॉग घटला. येत्या काही वर्षांतच तो पूर्ण करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.सिंदेवाही येथे मुख्यमंत्र्यांची सभा सोमवारी पार पडली. त्यावेळी आपल्या २० मिनिटांच्या भाषणातून त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षांवर जोरदार हल्ला चढविला. ते म्हणाले की, दोन्ही पक्षांनी मागील १५ वर्षात महाराष्ट्र कर्जात टाकला. सिंचन विद्युत, शिक्षणाची वाट लावली. केंद्रात व राज्यात ते सत्तेत असूनही गोसेखुर्द प्रकल्प १५ वर्षांपासून रखडत राहिला. मागील दोन वर्षांत या प्रकल्पाला केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने कोटी रुपये दिले आहे. येणाऱ्या काही वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होईल, असे सांगून राज्यातील सध्याचे सरकार शेतकऱ्यांचा पीकविमा, धानाला योग्य भाव, सिंचन व्यवस्था याला प्राधान्य देवून काम करणारे आहे. सामान्यांना हक्काचे घर, मूलभूत सुविधा देण्याचा सरकारकडून प्रयत्न होत आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.. याप्रसंगी मंचावर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार बंटी भांगडिया, खासदार अशोक नेते, माजी आमदार अतुल देशकर, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष हरीश शर्मा आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)‘ते’ शाई फेकणारे काँग्रेसचेच- मुनगंटीवारकाँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या सभेत मंचावर चढून त्यांच्यावर शाई फेकण्याचा प्रकार नागपुरात रविवारी घडला होता. यावर बोलताना वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, शाई फेकणारे काँग्रेसचेच कार्यकर्ते होते. मागील १५ वर्षात काँग्रेसने घोटाळे करून ठेवले. ही बाब जनतेच्या मनात खटकत आहे. त्यामुळे त्यांच्याच कार्यकर्त्यांनी हा राग असा व्यक्त केला. सिंदेवाहीला नगर पंचायतीमध्ये सत्ता दिली. आता आपण या शहरासाठी तीन कोटी रुपये देण्याचा शब्द लवकरच पूर्ण करू.
सिंचनाचा बॅकलॉग आमच्याच काळात घटला - मुख्यमंत्र्यांचा दावा
By admin | Published: February 14, 2017 12:34 AM