नागभीड : सध्या सर्वत्र ई-पीक नोंदणीची मोहीम जोरात सुरू आहे. ही ई-पीक नोंदणी शेतकऱ्यांसाठी तापदायक आहे, असा आरोप होत असला तरी नागभीड तालुक्यात मात्र १७ हजार ३३४ शेतकऱ्यांनी ही ई-पीक नोंदणी केली असल्याची माहिती आहे.
यापूर्वी ही पीक नोंदणी गावातील तलाठ्यांमार्फत करण्यात येत होती. पण तलाठ्यांकडून ही ई-पीक नोंदणी वस्तुनिष्ठ होत नसल्याचा आरोप करण्यात येत होता. तलाठी कार्यालयात बसूनच पीक नोंदणी करतात, असेही बोलले जात होते. म्हणून शासनाने ही पीक नोंदणीच्या पद्धतीत मोठे बदल करून यावर्षीपासून शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतातील पीक नोंदणी स्वतःच करावी, असे आदेश काढले.
ई-पीक नोंदणीत शेतातील पिकासंदर्भातील इतर विविध माहितींसह शेतातील पिकाचा फोटो शासनाने नेमून दिलेल्या संकेतस्थळावर अपलोड करणे गरजेचे आहे. ही प्रक्रिया पार पाडताना शेतकऱ्यांना प्रारंभी विविध अडचणीही आल्या. अनेकदा नेटवर्क प्राब्लेम आला. मात्र या अडचणींवर मात करून या तालुक्यातील शेतकऱ्यांनी ई-पीक नोंदणीत चांगलीच आघाडी घेतली आहे. नागभीड तालुक्यात एकूणच २४ हजार ४११ खातेदार शेतकरी आहेत. ई-पीक नोंदणीची मोहीम सुरू झाल्यापासून आतापर्यंत १७ हजार ३३४ शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकाची ई-पीक नोंदणी करून घेतली आहे. ही तालुक्यासाठी खरोखरच समाधानकारक बाब आहे.
बॉक्स
जिल्हाधिकाऱ्यांनीही जाणून घेतली माहिती
जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी रविवारी नागभीड तालुक्यातील बाह्मणी आणि नवखळा या महसुली गावातील बांधांवर प्रत्यक्षात भेट देऊन ई-पीक नोंदणीचा आढावा घेतला. यावेळी उपविभागीय अधिकारी संदीप भसके, तहसीलदार मनोहर चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी यावेळी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून ई-पीक नोंदणीची माहिती जाणून घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी पिकांविषयी अडचणी जिल्हाधिकारी यांच्यासमोर मांडल्या असता कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत, त्या समस्या सोडविण्याच्या सूचना केल्या.
कोट
ई-पीक नोंदणी ३० सप्टेंबर २०२१पर्यंत करावयाची आहे. शेतकऱ्यांनी ही ई-पीक नोंदणी मुदतीत करून घ्यावी.
- मनोहर चव्हाण, तहसीलदार, नागभीड
260921\img-20210926-wa0034.jpg
बांधावर जाऊन ई पीक नोंदणीची माहिती घेतांना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने