लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: सिद्धबली इस्पात लिमिटेड हा पोलाद निर्मितीचा कारखाना सुरु असून या कारखान्याच्या स्थापनेपासून या परिसरातील शेकडो कामगार काम करीत आहे. कारखाना व्यवस्थित सुरु असताना कारखाना व्यवस्थापनाने येथे काम करीत असलेल्या कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता तसेच या कारखान्यात कार्यरत कामगार युनियन प्रतिनिधीशी कोणतीही चर्चा न करता अचानकपणे बिना स्वाक्षरीचे पत्र नोटीस बोर्डवर लावून बेकायदेशिररित्या कारखाना बंद केला, असा आरोप माजी खासदार नरेश पुगलिया यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला.आपल्या मागणीसाठी काँग्रेस कमिटीच्या वतीने गांधी चौकात धरणे आंदोलनही करण्यात आले. यावेळी पुगलिया म्हणाले, सिध्दबली इस्पात हा कारखाना अनेकांना रोजगार देऊन गेला. अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाह या कारखान्यावर अवलंबून आहे. मात्र कारखानदार आपल्या फायद्यासाठी कामगारांवर अन्याय करीत आहे. कामगारांना कायदेशीर देणे असलेली कोणतीही रक्कम न देता कामगारांना कामावरुन बंद केले. कामगारांनी सहाय्यक कामगार आयुक्तांकडे याबाबत रितसर तक्रार केली. परंतु व्यवस्थापनाने अजूनपर्यंत कोणतीही देय रक्कम दिली नाही व कामगारांना परत कामावर घेतले नाही. कामावरुन कमी केलेल्या कामगारांना कामावर न घेता नवीन कामगारांना कामावर घेवून काम सुरु केले आहे. यामुळे जुन्या कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो, असेही पुगलिया यांनी यावेळी सांगितले. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले असून स्वत: त्यांनी या प्रकरणात लक्ष घालून कामगारांच्या देय रकमा व कामगारांना पुर्ववत कामावर घेऊन कामगारांना न्याय मिळवून द्यावा. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील माणिकगढ सिमेंट कंपनीद्वारे दोन महिन्यांपूर्वी ४० वर प्रांतिय कामगारांना सिमेंट लोडींगकरिता आणण्यात आल्यामुळे जुन्या कामगारांना कमी दिवस काम मिळत आहे. परप्रांतीय कामगार प्रशासनाची परवानगी न घेता घेण्यात येत असून राज्य शासनाच्या धोरणाविरोधात स्थानिक कामगारांना डावलण्यात येत आहे. यामुळे कामगार क्षेत्रात वातावरण खराब होण्याची चिन्हे दिसत आहेत, असा धोकाही मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिल्याचे पुगलिया यांनी सांगितले. यावेळी विनोद अहीरकर, गजानन गावंडे, सुरेश महाकूळकर आदी उपस्थित होते.कारखानाच विकल्याची माहितीसिद्धबली इस्पात लिमिटेड हा उद्योग सुरु करण्याच्या दिशेने कामकाज सुरु झाले आहे व इतर सवलतीमुळे शासनाच्या सबसीडी स्वस्त दरात ताडाळी एमआयडीसी येथे कारखान्याला लागणारी जमीन, पाणी, वीज, कर सवलती लाटल्या व आता हा उद्योग विकण्यात आल्याची माहिती आपणाला मिळाली असल्याचे नरेश पुगलिया यांनी यावेळी सांगितले. नवीन उद्योजकाने कारखाना विकत घेतला असून नियमाप्रमाणे जुन्या कामगारांना कामावर परत घेणे आवश्यक असतानानुसद्धा नवीन कामगारांना घेण्यात येत आहे. त्यामुळे जुन्या कामगारांवर अन्याय होईल व तो खपवून घेतला जाणार नाही.
नियमबाह्य कारखाना बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 11:08 PM
सिद्धबली इस्पात लिमिटेड हा पोलाद निर्मितीचा कारखाना सुरु असून या कारखान्याच्या स्थापनेपासून या परिसरातील शेकडो कामगार काम करीत आहे. कारखाना व्यवस्थित सुरु असताना कारखाना व्यवस्थापनाने येथे काम करीत असलेल्या कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता तसेच या कारखान्यात कार्यरत कामगार युनियन प्रतिनिधीशी कोणतीही चर्चा न करता अचानकपणे बिना स्वाक्षरीचे पत्र नोटीस बोर्डवर लावून बेकायदेशिररित्या कारखाना बंद केला, असा आरोप माजी खासदार नरेश पुगलिया यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला.
ठळक मुद्देनरेश पुगलियांचा आरोप : पूर्वसूचना न देता कामगारांना कामावरून काढले