चंद्रपूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू असताना जिल्हा प्रशासनाकडून सातत्याने खबरदारीच्या सूचना दिल्या जात आहेत. मात्र, कोरोना गेल्याच्या भ्रमात राहून बेजबाबदारपणे वागणाऱ्या नागरिकांना शुक्रवारी जोरदार धक्का बसला. एकाच दिवशी तब्बल १७६ जणांना कोरोनाची बाधा झाली तर एका महिलेचा मृत्यू झाला.
त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा प्रादुर्भाव वाढू लागल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने अॅन्टिजेन व आरटीपीआर चाचण्यांची संख्या वाढवली. प्रतिबंधात्मक उपाययोजना करतानाच बाधितांवर उपचार करण्यासाठी आरोग्याच्या मूलभूत सुविधा निर्माण केल्या. कोविड हॉस्पिटल, कोविड केअर हेल्थ सेंटर व प्रत्येक तालुक्यात अॅन्टिजेन तसेच आरटीपीआर चाचण्यांसाठी केंद्र तयार केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये सातत्याने जागृती केली जात आहे. पण, कोरोना आटोक्यात आला नाही.
त्रिसूत्रीचा विसर महागात पडणार
नियमित मास्क वापरणे, शारीरिक अंतर पाळणे, वारंवार हात धुणे ही साधी त्रिसूत्री पाळण्याचे भान नागरिकांना राहिले नाही. त्यामुळे शुक्रवारी कोरोनाचा उद्रेक होऊन तब्बल १७६ जणांना बाधा झाली. जिल्ह्यात २४ तासात ५४ जणांनी कोरोनावर मात केली तर बल्लारपूर येथील ६८ वर्षीय बाधित महिलेचा मृत्यू झाला आहे.
चंद्रपूर हॉट स्पॉट होण्याची भीती
जिल्ह्यात बाधितांची संख्या २४ हजार ४९ वर पोहोचली. सध्या ५५५ बाधित उपचार घेत आहेत. दोन लाख १९ हजार ७७७ नमुन्यांची तपासणी झाली. त्यापैकी एक लाख ९३ हजार ५१८ नमुने निगेटिव्ह आले. मात्र, चंद्रपूर शहरातच रुग्णसंख्या वाढत असल्याने हॉट स्पॉट होण्याची भीती आहे.
तालुकानिहाय रुग्ण
आज बाधित आढळलेल्या १७६ रूग्णांमध्ये चंद्रपूर मनपा क्षेत्रात ३३, चंद्रपूर तालुक्यातील एक, बल्लारपूर एक, भद्रावती आठ, ब्रह्मपुरी एक, नागभीड तीन, सावली १९, राजुरा आठ, चिमूर सहा, वरोरा ५९, कोरपना १४, जिवती २० व इतर ठिकाणच्या तीन रुग्णांचा समावेश आहे.
कोट
कोरोना संपला, या मानसिकतेतून नागरिकांनी बाहेर यावे. प्रशासनाकडून सर्व खबरदारी घेतली जात आहे. मात्र, नागरिक म्हणून प्रत्येकाने कर्तव्य पाळावे.
मास्कशिवाय घराबाहेर निघू नये. अनावश्यक कामे टाळावे.
-अजय गुल्हाने, जिल्हाधिकारी, चंद्रपूर