विसापूर : कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. मात्र जिल्ह्यात डेंग्यू आणि मलेरियाने थैमान घातले आहे. अशा वातावरणात गावातही डेंग्यू व मलेरियाचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीतर्फे फॉगिंग मशीनने संपूर्ण गावात धूरफवारणी करून गाव डेंग्यूमुक्त करावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र विसापूरने कंटेनर सर्व्हे करून आशा वर्करच्या मदतीने गृहभेटी देऊन डेंग्यू आजाराबाबत जनजागृती करताना पाणी साचवून ठेवू नये, आठवड्यातील एक दिवस कोरडा पाळावा, असे आवाहन केले आहे. भिवकुंड परिसरातील नागरिकांना मच्छरदाणीचे वाटप केले आहे. त्यामुळे परिस्थिती थोडीफार नियंत्रणात आहे. परंतु वॉर्डात वाढत असलेली अस्वच्छता, नाल्यांमध्ये साचून राहिलेले पाणी, सार्वजनिक विहिरी तसेच तलावात साचलेले पाणी यामुळे डासांच्या पैदासीचे प्रमाण वाढले आहे. शिवाय रोडच्या बाजूला गवत वाढल्याने सरपटणाऱ्या विषारी प्राण्यांपासून नागरिकांना इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून ग्राम प्रशासनाने डासांचा प्रकोप रोखण्यासाठी धूर फवारणी करावी. तसेच रोडच्या बाजूच्या गवतावर फवारणी करून ते नष्ट करावे आणि परिसर स्वच्छ व भयमुक्त करावा. अशी मागणी होत आहे.