फोटो
बल्लारपूर : जननायक भगवान बिरसामुंडा यांचे आदिवासी समाजात आदरणीय स्थान आहे. इंग्रजांविरुद्ध बंड करून त्यांनी समाजाला आत्मसन्मानाची दिशा दिली. आदिवासी समाजाचे प्रेरणादायी असणाऱ्या भगवान बिरसामुंडा यांचा पुतळा चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील रेल्वेस्थानक परिसरात उभारण्यात आला होता. मात्र महानगरपालिका प्रशासनाने सूडबुद्धीने पुतळा हटविला. यामुळे आदिवासी समाजात आक्राेश निर्माण झाला आहे. याप्रकरणी भाजपा आदिवासी आघाडीच्या माध्यमातून उपजिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करून पूर्ववत त्याच ठिकाणी पुतळा उभारण्याची मागणी केली आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेने भगवान बिरसामुंडा यांचा पुतळा हटवून विकृत मानसिकतेचे दर्शन घडविले आहे. या प्रकारामुळे आदिवासी समाजात संताप व्यक्त केला जात आहे. जिल्हा प्रशासनाने याप्रकरणी दखल घेऊन क्रांतिसूर्य भगवान बिरसामुंडा यांचा पुतळा पुन्हा त्याच ठिकाणी उभारावा, असी आग्रही मागणी जिल्हा परिषद सदस्य व भाजप आदिवासी आघाडीचे अध्यक्ष ॲड. हरिश गेडाम यांनी केली आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने भगवान बिरसामुंडा यांचा पुतळा उभारण्यासंदर्भात ठराव मंजूर केला. त्याच आनुषंगाने क्रांतिसूर्य भगवान बिरसामुंडा यांचा पुतळा उभारण्यात यावा, आदिवासी समाजात निर्माण झालेला असंतोष कमी करावा, महानगरपालिका प्रशासनाने जातीय तेढ निर्माण करू नये, अशी मागणी जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. यावेळी शिष्टमंडळात भाजप आदिवासी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य ॲड. हरिश गेडाम, भाजपा आदिवासी महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष व पाेंभुर्णा पंचायत समिती सभापती अलका आत्राम, जि. प. सदस्य रणजित साेयाम, जि. प. सदस्य नैना गेडाम, जि. प. सदस्य याेगीता डबले, रूपा सुरपाम, जि. प. सदस्य विद्या किलनाके, जि. प. सदस्य शीतल बांबाेडे यांचा समावेश होता.