नोकरभरती सुरू करण्याची मागणी
फोटो
ब्रह्मपुरी : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने संपूर्ण देश हताश आणि नागरिक हतबल झाले. अनेकांचे रोजगार गेले, हाताला काम नसल्याने अनेक सुशिक्षित युवक बेरोजगार झाले. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे अनेक युवक-युवती नोकरभरती बंद असल्याने मानसिकदृष्ट्या खचत चालले आहेत. या समस्येकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी ब्रह्मपुरी येथे आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
सुशिक्षित बेरोजगार युवकांनी जनआंदोलन उभारून विद्यार्थी कृती समिती व विविध संघटनांच्या वतीने नोकरभरती सुरू करा, एमपीएससी व इतर परीक्षा नियमित सुरू करा, स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून द्या, इत्यादी मागण्या घेऊन सुरज मेश्राम, सुदान राठोड, नरेश रामटेके, पद्माकर रामटेके, प्रशांत डांगे, सतीश डांगे, लक्ष्मण मेश्राम यांच्या नेतृत्वात आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांनी विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करावी, अशा आशयाचे निवेदन सिनेट सदस्य डॉ. देवेश कांबळे व गोविंदराव भेंडारकार यांना देऊन मोर्चास सुरुवात करण्यात आली. मोर्चा हुतात्मा स्मारक येथून निघून बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे चौक, झाशी राणी चौक, आनंद चौकापासून तहसील कार्यालयात नेऊन मागणीचे निवेदन राष्ट्रपती, राज्यपाल यांना उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांच्यामार्फत पाठविण्यात आले. यावेळी उदय पगाडे, रोशन मेंढे, विवेक रामटेके, सुमेध वालदे, निकेश तोंडरे, राहुल सोनटक्के, सुरज चौधरी, आतिश झाडे, रक्षित रामटेके, निहाल ढोरे आदी सहभागी झाले होते.
110721\1649-img-20210710-wa0057.jpg
आक्रोश मोर्च्यात सहभागी झालेले बेरोजगार युवक