लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत १ ते १६ डिसेंबर या कालावधीत आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन नागरिकांची कुष्ठरोग व क्षयरोग तपासणी करणार आहेत. रोगाचे निदान झाल्यास रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय येथे मोफत औषधोपचार मिळणार आहे. जिल्ह्यात २१ लाख नागरिकांची या उपक्रमाद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. नागरिकांनी कुष्ठरोग व क्षयरोग तपासणी अभियानास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे जिल्हास्तरीय समन्वय समितीची सभा पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कार्डिले, पोलीस उपअधिक्षक शेखर देशमुख, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, डॉ. सुधीर मेश्राम, डॉ. प्रतिक बोरकर, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. संदिप गेडाम, डॉ. प्रकाश साठे, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. ए.एस.खंडारे, डॉ. हेमचंद कन्नाके, श्रीनीवास मूळावार, भास्कर सोनारकर व आरोग्य विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.सदर मोहिमेचा उद्देश समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधुन त्यांना औषधोप करणे, नवीन सांसर्गिक कुष्ठरुग्ण शोधुन बहुविध औषधोपचाराद्वारे संसर्गाची साखळी खंडित करुन होणारा प्रसार कमी करणे, समाजात कुष्ठरोगा विषयी जनजागृती करणे असा आहे. सदर मोहिमेत क्षयरोगाच्या निदानाअभावी अद्यापही वंचित असणाऱ्या क्षयरुग्णाचा शोध घेऊन त्यांना क्षयरोग औषधोपचार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.बाॅक्समोहिमेकरिता शहरी व ग्रामिण भागातील एकुण २१ लाख १३ हजार २७६ लोकसंख्येकरिता एकुण १ हजार ४८७ टिम कार्यरत राहणार असल्याची माहिती सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. संदीप गेडाम यांनी यावेळी दिली.जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी जिल्हा अवयवदान समन्वय समिती, लसीकरण मोहिम, बोगस डॉक्टर शोध मोहिम या समित्यांचा देखील आढावा घेतला.