लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना संसर्गावर प्रतिबंधात्मक लस लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही लस आलीच तर ती प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचेल, यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने नियोजन केले आहे. यासाठी जिल्ह्यात सुमारे अडीच हजारांवर कर्मचाऱ्यांची फौज तयार केली जात आहे.लसीकरणासाठी तयार होत असलेल्या पथकांमध्ये वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय कर्मचारी, परिचारिका, पर्यवेक्षक, प्रशासकीय कर्मचारी यांचा समावेश आहे. ही लस इंजेक्शन स्वरुपात असणार आहे. याशिवाय या लसीला ८ डिग्री सेल्सीयस तापमानात ठेवावे लागणार आहे. त्यामुळे तशा प्रकारच्या रेफ्रीजरेटर्सची व्यवस्था आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, एकाच वेळी दोन लाख लसींचा साठा करता येऊ शकेल, अशीही व्यवस्था आरोग्य विभागाने केली आहे.
केंद्र शासनाकडून मिळणार प्रशिक्षणकोविडवरील लसीकरणासाठी निवड करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. लवकरच या प्रशिक्षणाला सुरूवात होणार आहे. ही लस किती तापमानात ठेवायची, लसीची तालुका पातळीवर वाहतूक कशी करायची, लस इंजेक्शन स्वरुपात असल्याने ती मोहिमेत सहभागी कर्मचाऱ्यांना योग्य पध्दतीने कशी देता येईल आदी बाबी शिकविल्या जातील.
सर्वात आधी लस १५,७०० जणांनाकोरोना संसर्गावर प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम जेव्हा चंद्रपूर जिल्ह्यात सुरू होईल, तेव्हा सर्वप्रथम ही लस १५ हजार ७०० लोकांना दिली जाणार आहे. यात वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, परिचारिका व आरोग्य विभागाशी संबंधित फ्रंट लाईनवर काम करणाºयांचा समावेश असणार आहे. त्याचा डेटा जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे.ग्रामीण स्तरापर्यंत जाणार लस जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कोराना लसची ग्रामीण स्तरापर्यंत वाहतूक व साठा करण्याबाबत सध्या उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती नुकतीच जाणून घेतली. जिल्ह्यात सध्या एकाचवेळी इतर लसीव्यतिरिक्त कोविडच्या दोन लाख लसींचा साठा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यावर त्यांनीही समाधान व्यक्त केले. ग्रामीण भागात विहित तापमान मर्यादेत लस पोहचविली जाईल.