चंद्रपूर : विद्यार्थ्यांनी स्वत:मध्ये कोणत्या चांगल्या आणि कोणत्या वाईट गोष्टी आहेत, हे समजून चांगल्या गोष्टी वाढविण्याचा प्रयत्न करावा. वाईट गोष्टींवर मात करीत एक प्रभावी व्यक्तिमत्त्व घडण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन प्राचार्य श्याम धोपटे यांनी केले.
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली व सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य आर. पी. इंगोले तर प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार, शिक्षण विभाग प्रमुख डॉ. विजय सोमकुंवर, प्रा. कुलदीप गोंड, डॉ. पुरुषोत्तम माहोरे, डॉ. निखिल देशमुख आदी उपस्थित होते.
प्राचार्य इंगोले म्हणाले, विद्यार्थ्यांनी मार्गदर्शनातून आपल्या जीवनात बदल घडवून आणून व्यक्तिमत्त्व घडवावे, असे आवाहन केले. प्रास्ताविक डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार, सूत्रसंचालन राजेश हजारे तर अर्चना प्रजापती यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी रासेयो विभाग समन्वयक प्रा. कुलदीप गोंड, डॉ. पुरुषोत्तम महोरे, डॉ. निखिल देशमुख, डॉ. वंदना खनके, राजेश इंगोले आदींनी परिश्रम घेतले.