बल्लारपूर : तालुक्यातील विसापूर येथील वर्धा नदीच्या कोलगाव घाटावरुन चंद्रपूर वेकोलिच्या माना व नांदगाव कोळसा खाणीसाठी रेतीची वाहतूक केली जात आहे. एका जडवाहनाच्या धडकेत रविवारी बैलाचा अपघात झाला. याचीे तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली. येथील नागरिकांच्या दबावतंत्रामुळे पोलिसांनी तब्बल सहा ट्रक ओव्हरलोड वाहतूक केल्याप्रकरणी जप्त करून चालकावर गुन्हे दाखल केले.विसापूर-नांदगाव (पोडे) कोलगाव नदी घाटापर्यंत ग्रामीण रस्ता आहे. वेकोलिच्या रेती वाहतुकीमुळे रस्त्यालगतच्या शेतातील पीक करपू लागले आहेत. यामुळे विसापूर ग्रामपंचायतीने शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी वेकोलिची रेती वाहतूक बंद करण्याच्या अनुषंगाने वेकोलि प्रशासन व जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर दिले. रेती वाहतूक बंद करण्याची विनंती करण्यात आली. परंतु रेतीची वाहतूक करणारे कंत्राटदार जुमानले नाही.अशातच विसापूर येथील भोला पाटणकर या शेतकऱ्यांच्या बैलाला एका जडवाहनाने धडक दिली. यात बैल जखमी झाला. त्यामुळे गावकऱ्यांचा रागही अनावर झाला. घटनास्थळी पोलिसांना बोलविण्यात आले. यावेळी ठाणेदार प्रदीप सिरस्कर यांच्या मार्गदर्शनात वेकोलिसाठी रेतीची वाहतूक करणारे फुलचंद नामक कंत्राटदाराचे पाच जडवाहने ताब्यात घेतले. येथील एका व्हेब्रिजवर वाहनाच्या वजनाची मोजणी करण्यात आली. यात प्रमाणापेक्षा अधिक रेतीची वाहतूक होत असल्याने मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.अशातच ट्रक एम.एच.३४ ए.बी- १७७१ रेती वाहतूक परवान्यात खोडतोड करून रेतीची वाहतूक करीत असल्याचे तहसील कार्यालयाने कारवाई करुन के.के. ओझा चंद्रपूर यांच्याकडून २३ हजार ७०० रुपये दंडाची रक्कम वसुल केल्याची माहिती तहसीलदार डी.एस. भोयर यांनी दिली.(शहर प्रतिनिधी)
ओव्हरलोड रेती वाहतूक करणारे सहा ट्रक जप्त
By admin | Published: November 25, 2015 3:38 AM