फोटो
प्रकाश काळे
गोवरी : बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या कोळसा खाणीतून वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून सर्रास जीवघेणी ओव्हरलोड वाहतूक केली जात आहे. त्यामुळे रस्ते अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ झाल्याचे दिसून आल्याने ओव्हरलोड वाहतुकीवर आळा घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या सास्ती, गोवरी, पोवनी, गोवरी डीप कोळसा खाणीतून वाहतुकीचे नियम सर्रास धाब्यावर बसवून ओव्हरलोड वाहतूक केली जात आहे. अनेकदा कोळशाची वाहतूक करताना ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा पल्ल्याच्या वरती कोळसा भरला जातो. रस्त्याने जाताना अशी ओव्हरलोड वाहतूक नेहमीच नागरिकांसाठी जीवघेणी ठरली आहे. परंतु याकडे आजपर्यंत कुणीही लक्ष दिले नाही .त्यामुळे दिवसेंदिवस रस्ता अपघातात वाढ झाली आहे. ओव्हरलोड वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांची आहे. परंतु आजपर्यंत कोळशाच्या ओव्हरलोड वाहतुकीवर नियंत्रण मिळविण्यात वाहतूक पोलीस विभाग अपयशी ठरला आहे. ओव्हरलोड वाहतुकीने रस्त्याचे बारा वाजले आहेत. रस्त्याच्या क्षमतेपेक्षा वाहनातून ओव्हरलोड वाहतूक केली जाते. त्यामुळे करोडो रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या रस्त्यांची अल्पावधीतच दुरवस्था झाली आहे. मात्र याकडे अजून कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. कोणतीही वाहतूक करताना वाहतूक परिवहन विभागाने ठरवून दिलेल्या पासिंगपेक्षा अधिक मालाची वाहनातून वाहतूक करता येत नाही. बहुतांश वाहनातून कोळसा खाली पडू नये किंवा प्रदूषण होऊ नये, यासाठी ताडपत्री झाकणे बंधनकारक असताना मात्र वेकोलित वाहतुकीचे हे नियम पाळले जात नाही.त्यामुळे वेकोलितील ओव्हरलोड वाहतूक आता नागरिकांच्या जीवावर उठली आहे.
बॉक्स
वाहतूक पोलीस विभागाचे दुर्लक्ष
कोळसा खाणीतून दिवस-रात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहतूक केली जात असताना याकडे वाहतूक शाखा जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. अशा वाहनावर कारवाई करणे गरजेचे असताना ओव्हरलोड वाहतुकीवर कोणीही कारवाई करण्यास धजावत नाही.
त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या कार्यप्रणालीवर शंकाच व्यक्त केली जात आहे.
कोट_
वेकोलितून केली जाणारी ओव्हरलोड वाहतूक नागरिकांसाठी अतिशय जीवघेणी झाली आहे. अनेकदा ट्रकमधून कोळसा पडून अपघाताच्या गंभीर घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे ओव्हरलोड वाहतुकीला आळा घालण्याची गरज आहे.
-प्रमोद लांडे,नागरिक गोवरी.