चंद्रपूर : पारंपरिक शेती नुकसानदायक ठरत आहे. बाजारपेठेचा वेध घेऊन व आपण काय पिकवतो, हे लक्षात घेऊन शेती केली तर शेती फायदेशीर ठरू शकते आणि असाच शेती प्रयोग राजुरा तालुक्यातील विहीरगाव येथे वेकोलिचे सेवानिवृत्त कर्मचारी कवडू रामचंद्र बोढे यांनी आपल्या एक एकरात केला. त्यांनी साता समुद्रापार पिकणाऱ्या ड्रॅगन फ्रूटची अनोखी शेती फुलवून शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. कांताई ड्रॅगन फ्रूट फार्मचा हा चंद्रपूर जिल्ह्यातला पहिलाच प्रयोग आहे.
कांताई ड्रॅगन फ्रूट फार्म विहीरगावचे कवडू बोढे हे २०१७ मध्ये वेकोलितून सेवानिवृत्त झाल्यानंतर २०१८मध्ये शेतीकडे वळले. दोन एकर असलेल्या शेतीत पारंपरिक पध्दतीने शेती केली. त्यात त्यांना फारसे उत्पन्न मिळाले नाही. तेव्हा पारंपरिक शेतीला फाटा देण्याचे ठरविले. दोनपैकी एक एकरात आरोग्यदायी फळ असलेल्या ड्रॅगन फ्रूटची लागवड करण्याचा निर्धार केला. मात्र, जिल्ह्यात पहिल्यांदाच या पिकाची लागवड केल्याने त्यांना खूप अभ्यास करावा लागला. ग्रामसेवक असलेला मुलगा रवी बोढे यांचीही मोठी साथ मिळू लागली. अधिक तापमान असलेल्या जिल्ह्यातही हा प्रयोग त्यांना यशस्वी करता आला. गुजरातवरून रोपे आणून शेतात लागवड केली. त्यासाठी सुरूवातीला सिमेंट खांब, रिंग तसेच ठिबकची सोय करून सेंद्रिय पद्धतीने विविध मिश्रणाचा वापर करीत बाग फुलविली. यासाठी त्यांना जवळपास साडेतीन लाख रुपयांचा खर्च आला. सुरुवातीला हे पीक खर्चिक वाटत असले तरी या पिकातून मिळणारा नफा हा शाश्वत स्वरूपाचा आहे. पहिल्या आणि दुसऱ्या वर्षीपेक्षा तिसऱ्या वर्षी म्हणजे यंदा त्यांना दीड लाखांचे उत्पन्न अपेक्षित असले तरी शेतीत नवनवीन प्रयोग करण्याचा बोढे यांचा मानस आहे.
ग्रामसेवक मुलाची साथ मोलाची
रवी बोढे हे कृषी पदविका घेऊन ग्रामसेवक म्हणून नागरिकांना सेवा देत असले तरी तितकीच साथ वडिलांना शेतात राबवित असलेल्या पीक प्रयोगात दिली. यामुळे शेतीत केसर आंबा, गोल्डन सीताफळ, पेरू, सरबती लिंबू तसेच ड्रॅगन फ्रूटसारख्या फळझाडांची मिश्रबाग योग्य नियोजन व परिश्रमाने यशस्वी करता आली. मात्र, जिल्ह्यात हा प्रयोग पहिल्यांदा यशस्वी होऊन कृषी विभागाने या प्रयोगशील शेतीला साधी भेटही दिली नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
स्थानिक बाजारपेठेत प्रतिसाद -
ड्रॅगन फ्रूट विक्रीसाठी कोणत्या शहरात न्यायचे, असा प्रश्न होता. मात्र, स्थानिक राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर शहरात मार्केटिंग केल्यानंतर अनपेक्षित प्रतिसाद मिळू लागला. २०० ते २५० रुपये प्रतिकिलो भाव मिळत आहे.
आरोग्यदायी ड्रॅगन फ्रूट -
ड्रॅगन फ्रूटमध्ये व्हिटॅमिन सी चे प्रमाण अधिक असते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी हे फळ उपयुक्त आहे. डेंग्यूसारखा आजार झालेल्या रुग्णांच्या पांढऱ्या पेशा कमी झालेल्या असतात. या कमी झालेल्या पेशी वाढविण्यासाठी डाॅक्टरांकडून रुग्णांना ड्रॅगन फ्रूट खाण्याचा सल्ला दिला जातो शिवाय शरीरासाठी त्याचे आरोग्यदायी लाभ भरपूर असल्याने स्थानिक बाजारात मागणीही अधिक आहे.
वडिलांनी ड्रॅगन फ्रूटची शेती करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांना अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करून बागेचे व्यवस्थापन करीत आहे. आता हे ड्रॅगन फ्रूट पीक महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या Maha DBT अंतर्गत फळबाग योजनेत समाविष्ट करण्यात आले असून, शासनाकडून हेक्टरी १ लाख ६० हजार अनुदान देण्यात येत आहे.
कमी पाण्यावर येणारे व शेतकऱ्यांना भरपूर नफा मिळवून देणारे हे पीक शेतकऱ्यांना वरदान ठरेल, असा विश्वास आहे.
- रवी बोढे, विहीरगाव
240921\1544-img-20210924-wa0019.jpg~240921\1545-img-20210924-wa0020.jpg
आपल्या शेतातील ड्रॅगन फ्रूट दाखविताना रवी बोढे~ड्रॅगन फ्रूट ची बाग