ऑक्सिजनयुक्त खाटांची मोठ्या प्रमाणात व्यवस्था
फोटो
तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य विभाग सज्ज : ऑक्सिजनयुक्त खाटांची संख्या वाढविली
सचिन सरपटवार
भद्रावती : कोरोना रुग्णांबाबत भद्रावती तालुका जिल्ह्यात हॉटस्पॉट ठरत होता. आज स्थिती नियंत्रणात आहे. जीवाची पर्वा न करता कोरोनाच्या दोन लाटांशी यशस्वीपणे लढा देणारे प्रशासन आता तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज झाले आहे. तिसऱ्या लाटेत रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये म्हणून भद्रावतीत एक कोटी १९ लाख ८० हजार ६५८ रुपये खर्चून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारला जात आहे.
या प्रकल्पासाठी परवानगी मिळाली असून त्याचे वर्कऑर्डरसुद्धा निघाले आहे. दोन महिन्यात काम पूर्ण होईल. पाईपलाईनद्वारे ऑक्सिजन पुरवठा करण्यात येणार आहे. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी येत्या सहा ते सात दिवसात ग्रामीण रुग्णालयात ३० ऑक्सिजन बेडसह अद्ययावत असा कक्ष उभारण्यात येत आहे. यातील दहा खाटा लहान मुलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. यासोबतच आयुध निर्माणी चांदा हॉस्पिटलमध्ये १५ अतिरिक्त ऑक्सिजन खाटांची तयारी पूर्ण झाली आहे.
बॉक्स
ग्रामीण रुग्णालयात २० जम्बो तर २५ लहान सिलिंडर
ग्रामीण भागात प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध आहे. नुकतेच मुधोली येथे दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देण्यात आले. शहरी भागात ३५ तर ग्रामीण भागात ७ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची उपलब्धता करून ठेवली आहे. ग्रामीण रुग्णालयात २० जम्बो तर २५ स्मॉल ऑक्सिजन सिलिंडर आहे तर ३४ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आहे. एक आरटीपीसीआर सेंटर असून तीन ॲटिजन सेंटर आहे. तसेच एक फिरते पथक आहे.
बॉक्स
१७७ ॲक्टिव्ह रुग्ण
आतापर्यंत तालुक्यात एकूण ५८७८ पॉझिटिव्ह रुग्ण होते. बुधवारपर्यंत १७७ ॲक्टिव्ह रुग्ण होते तर ७५ कोरोनाबाधितांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. गुरुवारी जैन मंदिर विलगीकरणात ५१ तर श्री मंगल कार्यालय येथे १७ करोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहे.
बॉक्स
तिसऱ्या लाटेत कर्मचाऱ्यांची गरज
तिसऱ्या लाटेचा विचार करता ग्रामीण व शहरी भागात कोविड कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. ग्रामीण भागात पाच आरोग्य सेविका, शहरी भागात आठ परिचारिका व पाच डॉक्टरची आवश्यकता आहे. याव्यतिरिक्त आरटीपीसीआर केंद्र वाढवण्याची गरज आहे.
बॉक्स
चंदनखेडा व भटाळी ग्रामपंचायतीच्या कार्याची दखल
कोरोना संकट काळात अतिशय नियोजनबद्ध काम करून गावाला कोरोनामुक्त ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या चंदनखेडा ग्रामपंचायतच्या कार्याची दखल पंचायतराज प्रशासनाने राज्य स्तरावर घेतली असून चंदनखेडा ग्रामपंचायतीचे उत्तम कार्य म्हणून घोषित केले आहे. तसेच कोरोना काळातील उत्कृष्ट कार्याबद्दल भटाळी ग्रामपंचायतीचाही सन्मान करण्यात येणार आहे.
कोट
दुसऱ्या लाटेनंतर जी काही कमतरता जाणवली, त्यादृष्टीने तयारी करण्यात आली आहे. ऑक्सिजनयुक्त ३० अद्ययावत खाटांची ग्रामीण रुग्णालय येथे तयारी करण्यात आली आहे. तसेच आयुध निर्माणी चांदा व माजरी एरियातसुद्धा प्रत्येकी १५ ऑक्सिजनयुक्त खाटांची तयारी करण्यात आली आहे. ग्रामीण भागात २५ बेडचे विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले असून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरसुद्धा प्रत्येक प्राथमिक केंद्रात उपलब्ध करण्यात आलेले आहे.
-डॉ. मनिष सिंग,
वैद्यकीय अधीक्षक, भद्रावती.