पाच शेतकऱ्यांना लाभ : पूर्ववत सुरू करण्याची मागणीचिखलपरसोडी : शासनामार्फत शेतकऱ्यांचा सर्वागिण विकास व्हावा, यासाठी अनेक योजना राबविण्यात येतात. मात्र अनेक योजना फक्त नावापुरत्याच मर्यादित असतात. तर बहुतेक योजना काही काळासाठीच सुरू करून त्यामध्ये तथ्य नसल्याचे किंवा अन्य काही कारण समोर करुन ती योजनाच बंद करण्यात येत असते. नागभीड तालुक्यात राबविलेली पॅकिंग हाऊस ही योजना अशाप्रकारेच फोल ठरली. महाराष्ट्र शासनाने २०१३ - १४ मध्ये प्रत्येक तालुका कृषी विभागाच्या माध्यमातून ‘महाराष्ट्र फलोउत्पादन विकास’ या योजनेचा शुभारंभ केला. त्याद्वारे शेतीमध्ये भाजीपाला, फळे पिकविणाऱ्या शेतकऱ्यांसाठी उत्पादीत माल खराब न होता त्यांना चांगला भाव मिळावा, याकरिता त्याची योग्य देखभाल व साठवण करुन ठेवण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली. त्याद्वारे चांगल्या पद्धतीने पॅकिंग करता यावी, व उत्तम भाव मिळावा हा उद्देश होता. मात्र नागभीड तालुक्यात ही योजना थंडबस्त्यात दिसून येत आहे. अनेक लाभार्थी पात्र असूनही या योजनपासून वंचित आहेत. तालुक्यातील फक्त पाच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. अनेक शेतकरी या योजनेच्या प्रतीक्षेत आहेत. संबंधित विभागाकडे विचारणा केली असता, जिल्हास्तरावरून पूर्वसंमती प्राप्त झाल्यानंतरच त्याचा प्रस्ताव तयार करू, असे सांगण्यात आले आहे.पॅकिंग हाऊस ही योजना शेतकऱ्यांच्या हिताची असून शेतावरील भाजीपाला फळ झाडे लागवडीकडे शेतकरी वळून आर्थिक प्रगती होण्यास प्रोत्साहन देणारी असल्याने ही योजना पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी शेतकरी बांधव करीत आहेत. (वार्ताहर)
पॅकिंग हाऊस योजना थंडबस्त्यात
By admin | Published: October 06, 2016 1:32 AM