नागभीड : तालुक्यात धानाच्या हंगामास लवकरच प्रारंभ होणार आहे. कृषी विभागाचे यावर्षी तालुक्यात २७ हजार हेक्टर क्षेत्रात धान लागवडीचे नियोजन केले आहे.
नागभीड तालुक्याचे मुख्य आणि एकमेव पीक धानाचे आहे. धान या पिकावरच तालुक्याची अर्थव्यवस्थाही अवलंबून आहे. तालुक्यात जवळजवळ २७ हजार हेक्टर क्षेत्रात धानाचे पीक घेतल्या जाते. साधारणतः जूनच्या १५ तारखेनंतर आणि जुलैच्या १० तारखेपर्यंत धानाचे आवते आणि पऱ्हे टाकले जातात. पऱ्हे १५ ते २० दिवसांचे झाले आणि योग्य पाऊस पडला तर या पऱ्ह्याची रोवणी करण्यात येते. यावर्षीच्या हंगामाचा विचार केला तर शेतकऱ्यांनी आवते आणि पऱ्हे भरण्यास प्रारंभ केला नसला तरी ज्या शेतकऱ्यांना पाण्याची सोय आहे, असे शेतकरी पुढील आठवड्यात आवते व पऱ्हे भरण्याचा हंगाम सुरू करतील. तत्पूर्वी पेरणीपूर्व नागरणी, आवते व पऱ्ह्यांच्या जागेची मशागत करण्याच्या कामाला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे.
बॉक्स
तुरीचे पीक
धान पिकासोबतच शेतकरी बांधावर तुरीचे पीक घेत असतात. हे पीक मोठ्या प्रमाणावर नसले तरी काही प्रमाणात प्रत्येक शेतकरी आपल्या शेतात हे पीक घेत असतात. सध्या या बांधांवरील कचरा जाळणे, बांधांवर नवीन माती घालण्याचे काम सुरू झाले आहे.
बॉक्स
असा हवा पाऊस
नागभीड तालुक्याची पावसाची सरासरी १,२५६ मिमी आहे. जून महिन्यात २१३.४ , जुलै महिन्यात ४५०.९, ऑगस्ट महिन्यात ३४४.२, सप्टेंबर महिन्यात २०८.२ आणि ऑक्टोबर महिन्यात ३९.४ मिमी पाऊस पडायला पाहिजे. एवढा पाऊस पडला तर धान पीक चांगल्या प्रकारे होऊ शकते. पण शेतकऱ्यांच्या दृष्टीने दुर्दैवाची गोष्ट अशी की, असा पाऊस कधी पडतच नाही. नेहमी निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. कधी आवते व पऱ्हे भरल्यांतर पावसाने हात वर केले, कधी ऐन रोवणीच्या वेळेस पावसाने डोळे वटारले तर कधी धान पीक ऐन अंतिम टप्प्यात आल्यानंतर पावसाने दगा दिला आहे. पावसाच्या या दुष्टचक्रात या तालुक्यातील शेतकरी पुरता भरडून गेला आहे. पण दुसरा कामधंदा नसल्यामुळे नाइलाजास्तव शेतीचा हा न परवडणारा उद्योग येथील शेतकऱ्यांना करावा लागत आहे.