वेगवान वाहनांमुळे अपघाताची शक्यता
चंद्रपूर : स्पर्धात्मक युगात अल्पवयीन मुले मोटारसायकलवर स्वार होऊन सुसाट वेगाने दुचाकी चालवितात. त्यांच्याजवळ दुचाकी चालविण्याचा परवानाही नसतो. त्यामुळे अपघाताच्या घटनेमध्ये सातत्याने वाढ होत आहे. पोलिसांनी या युवकांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
अतिक्रमण हटविण्याची मागणी
माजरी : मागील काही वर्षांमध्ये लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे मिळेल तिथे घर बांधून अतिक्रमण करण्यात येत आहे. अतिक्रमणामुळे गावातील रस्ते अरुंद झाले असून अनेकवेळा वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. संबंधितांनी लक्ष देऊन अतिक्रमण हटविण्याची मागणी केली जात आहे.
वन्यप्राण्यांमुळे शेतकरी त्रस्त
चिमूर :तालुक्यातील बहुतांश नागरिकांचा शेती व्यवसाय आहे. मात्र, जंगलाशेजारील शेतीचे वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहे. त्यामुळे या प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता
राजोली : गावातील अंतर्गत रस्त्यांवर खड्डे असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत अहे. त्यामुळे या रस्त्यांची दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.