मारोडा : देशात कितीही बदल होवोत परंतु सामान्य शेतकऱ्यांनी परिस्थिती ‘जैसे थे’ राहते. पाच वर्षांत लोकप्रतिनिधी आर्थिकदृष्टया धनवान होतो. मात्र पाच वर्षांत शेतकरी कसा मागे पडतो व त्यांची चारही बाजूने कशी कोंडी होते, याचे सध्या ज्वलंत चित्र बघावयाला मिळते. याच परिस्थितीचा सामना सध्या लोकसभा व विधानसभेसाठी मतदान करणारे मतदार शेतकरी करीत आहेत.आगीत घर जळून खाक व्हावे व राख धुमसत राहावी, अशी अनेक शेतकऱ्यांची आज स्थिती झालेली आहे. यावर्षी आवश्यक तेवढा पाऊसच पडला नाही. पऱ्हे भरले ते जाग्यावरच सुकले. अनेक शेतकऱ्यांनी रोवणे केले. त्यांना पाणी मिळाले नाही रोवणे रोवलेलीच स्थिती राहिली. उभी रोपे सुकून गेली. वारंवार खंडीत वीज पुररवठा व अत्यंत संघर्ष करुन मिळविलेले पाणी शेताला मिळावे म्हणून आक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात शेतकऱ्यांनी मोठ्या हाल अपेष्टा भोगल्या. रात्र-रात्रं जागून काढली. ज्यांना पाणी मिळाले, त्यांच्या पिकांना धार आली. परंतु जंगली प्राणी, रानडुकरांनी शेतात धुमाकूळ घातला. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होत आहे. या क्षेत्राला लागूनच जंगल आहे. बफर झोनची सीमा आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना जंगली श्वापदांचा नेहमीच सामना करावा लागतो. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे काय? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. नुकत्याच सुरू झालेल्या धान कापणीसाठी मजुरही मिळत नसल्याने धान उत्पादकांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. महिलांना वारेमाप रोजी द्यावी लागते. पुरुष मजूर किमान २०० रुपये रोजी घेतात. एवढे पैसे देऊनही मजूर हाती लागत नसल्याचे चित्र या परिसरात आहे. शिकलेल्या माणूस धानाचे भारे खांद्यावर वाहायला डगमगत आहे.मारोडा, भादुर्णी, उश्राळा येथून सुमारे ४०० मजूर रोज मूल येथे कामाला येतात. त्यामुळे स्थानिक स्थितीवर शेतकरी नियंत्रण ठेऊ शकत नाहीत. काहींनी धान बांधणी करुन मळणीला प्रारंभ केला. याच काळात मागील वर्षी दोन हजार ३०० ते दोन हजार ४०० प्रति क्विंटल भाव होता. यावर्षी ४०० ते ५०० रुपयांनी भाव घसरला आहे. तरी खासगी सावकार व बँकांचे कर्ज देण्यासाठी व धान साठवणुकीची व्यवस्था नसल्यामुळे शेतकरी धान विकत आहेत. चारही बाजुंनी शेतकरी कोंडीत सापडले आहेत. गेल्या पाच वर्षांत अनेकांनी शेती सोडली. येणाऱ्या पाच वर्षात हिच स्थिती कायम राहिली तर धान्य उत्पादनाचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. किमान तीन हजार रुपये क्विंटल भाव मिळावा, अशी त्यांची मागणी आहे. (वार्ताहर)
धान उत्पादकांचे कंबरडे मोडणार
By admin | Published: November 27, 2014 11:32 PM