२५ एकर क्षेत्रात २० शेतकरी करणार लागवड
परिसरातील अनेक शेतकऱ्यांचा पुढाकार
फोटो
सचिन सरपटवार
भद्रावती : बदलत्या काळानुसार पारंपरिक पीक पद्धतीपेक्षा व्यावसायिक शेती करणे ही काळाची गरज आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर कमी वेळात तसेच कमी उत्पादन खर्चात शेतात जास्त उत्पादन घेतल्या जाऊ शकते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व तालुका कृषी विभागाचे मार्गदर्शन हे शेतकऱ्यांना निश्चितच फायदेशीर ठरू शकते.
यालाच अनुसरून चंदनखेडा येथे धान रोवणी यंत्राद्वारे रोवणी करण्याबाबत नियोजन सभा घेण्यात आली. सभेला चंदनखेडा परिसरातील ३० शेतकरी उपस्थित होते. २५ एकर क्षेत्रात २० शेतकऱ्यांनी लागवड करण्याची तयारी दर्शविली. या सभेला ग्रामपंचायतचे सरपंच नयन जांभुळे, ए.एफ.पी.ओ.चे व्यवस्थापक महेश नागपुरे यांनी मार्गदर्शन केले.
धान रोवणीसाठी रोवणी यंत्राचा वापर केल्यास उत्पादन खर्च व वेळेची बचत होऊ शकते. रोवणी यंत्राद्वारे पेरणी केल्यास १० ते १२ किलो प्रति एकरी बियाणे लागतात. यात शेतकऱ्यांची पारंपरिक पीक पद्धतीपेक्षा जवळपास ५० टक्के बचत होते. रोवणीसाठी मजूर मिळत नाही, यावरही मात करता येते. या यंत्राद्वारे लागवड केल्यास कमी वेळात जास्त क्षेत्रात रोहिणी होऊ शकते. तसेच पिकाची वाढ व उत्पादनातही वाढ होते. एक ते दीड तासात एका एकरात कमी खर्चात रोवणी होते. डिझेलचा व चालकाचा तसेच गोडाऊन ते शेतीपर्यंतच्या वाहतुकीचा खर्च सोडल्यास यासाठी अधिक खर्च लागत नाही.
खनिज विकास निधी व मानव विकास मिशन या योजनेअंतर्गत ग्रामसमृद्धी शेतकरी उत्पादक कंपनी, चंदनखेडा यांना अनुदानावर तीन धान रोवणी यंत्र देण्यात आले आहे. चंदनखेडा येथील या उत्पादन कंपनीकडून रोवणी यंत्र घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी धान रोवणीसाठी या यंत्राचा वापर करावा, असे आवाहन पंचायत समितीचे सभापती प्रवीण ठेंगणे, संवर्ग विकास अधिकारी डॉ. मंगेश आरेवार, तालुका कृषी अधिकारी मोहिनी जाधव तसेच कृषी अधिकारी सुशांत गादेवार यांनी केले आहे.