दारूबंदी कागदावरच: कार्यालयच झाले दारूचा अड्डा शंकर चव्हाण/संघरक्षीत तावाडे जिवतीचंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाली असली तरी जिवती तालुक्यातील दारूबंदी केवळ कागदावरच असल्याचे चित्र जिवती पंचायत समितीच्या जिन्यावरील व परिसरातील कचऱ्यात पडलेल्या रिकाम्या दारूच्या बाटल्या पाहिल्यावर दिसून येते. कार्यालयाच्या आवारात गुटखा, तंबाखू, खर्रा खाऊन थुंकू नये, अन्यथा कारवाही करण्यात येईल, असे पोस्टर्स भिंतीला लावले गेले आहेत. असे असतानाही काही कर्मचाऱ्यांनी छुप्या मार्गाने दारू आणून कार्यालयाच पिणाऱ्यांचे बिंग ‘लोकमत’ने १५ एप्रिल रोजी केलेल्या स्टिंग आॅपरेशन करून उघडकीस आणले आहे.जिवती तालुका हा तेलंगणा सीमेलगत असल्याने चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी होऊनही जिवतीत विशेष फरक पडला नाही. कारण येथून जवळच पुग्गागुडा, इंद्रामनी व केटानेरी येथे तेलंगना राज्याची दारू मिळते. त्यामुळे पिणाऱ्यांची संख्या कमी झाली नाही, उलट वाढतच चालली आहे. त्यामुळे अवैध दारू विक्रेतेही जिवतीत मान वर करू लागले आहेत. कर्मचारी मात्र कार्यालयात कुणीही लक्ष देत नाही म्हणून छुप्या मार्गाने दारू आणून आपली तलप भागवित आहेत.शासकीय कार्यालयात कुठलीही नशाबाजी करणे कायद्याने गुन्हा असला तरी याच कायद्याला फाटा देत कार्यालयात दारू पिवून रिकाम्या दारूच्या बॉटल्स् जिन्यावर व परिसरातील कचऱ्यात फेकले जात असल्याने मोठ्या प्रमाणात बॉटल्स् पडून असल्याचे आढळून आले. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार शासकीय कार्यालयातच राजरोसपणे सुरू असतानाही संबंधीत अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष का, करावे असा प्रश्न निर्माण होत आहे. ज्या कार्यालयातुन जनतेच्या हिताचे काम केले जाते, त्याच कार्यालयात आता दारूच्या बॉटल्स् बघायला मिळत आहे. दारूबंदीनंतर येथे दारू मिळते कशी व कार्यालयातच दारू पिण्याची हिंमत कशी वाढली, या संपूर्ण बाबीवरून कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. तहसीलदारांकडून कर्मचाऱ्यांची खरडपट्टी परिसरातील कचऱ्यात मोठ्या प्रमाणात दारूच्या रिकाम्या बॉटल्स् असल्याचा गंभीर प्रश्न ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन केल्यानंतर उघडकीस आणला. त्यामुळे तहसीलदार रविंद्र राठोड यांनी पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांना बोलावून चांगलीच खरडपटी केली व पुन्हा दारूच्या बॉटल्स् दिसल्यास कारवाई करण्याचे सुनावले.
पंचायत समितीच्या जिन्यावर दारूच्या बाटल्यांचा खच
By admin | Published: April 21, 2017 12:54 AM