: पंचायत राज समितीने भद्रावती तालुक्यातील घोडपेठ व पंचायत समिती भद्रावतीला बुधवारी अचानक भेट दिली. प्राथमिक आरोग्य केंद्र घोडपेठच्या गळणाऱ्या इमारतीबाबत समितीने ताशेरे ओढताना काम पूर्ण करण्याचे संबंधितांना निर्देश दिले. त्यानंतर घोडपेठ येथील क्वार्टर्स, पॅथॉलॉजी लॅब, औषधालयाची पाहणी केली. क्वार्टर्सची दुरुस्ती व साफसफाईबाबतही सूचना केल्या. झाडे तोडल्याने कानपिचक्या दिल्या. आष्टा येथील घरकुल मार्टबाबत प्रशंसा केली.
येत्या १५ दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सूचनासुद्धा दिल्या. घोडपेठ ग्रामपंचायतीला भेट देऊन संगणक कक्षाची तसेच सरकार सेवा केंद्राची पाहणी केली. ग्रामपंचायतीचे दस्तावेज व पासबुकची पाहणी केली. नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. पाणी पुरवठा योजनेला भेट देऊन मार्चपर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. यासोबतच निकृष्ट दर्जाचे काम करू नये, अशी समितीने संबंधितांना तंबी दिली.
समितीने पंचायत समिती भद्रावतीला भेट दिली. प्रश्ननिहाय गटविकास अधिकारी, गटशिक्षण अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, उपअभियंता बांधकाम व सिंचन तसेच सर्व खातेप्रमुख यांची याबाबत साक्ष नोंदविण्यात आली. तहसीलदार भद्रावती यांच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पंचायत समितीच्या जागेचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. ही जागा जिल्हा परिषदेच्या नावावर झाल्यानंतर या ठिकाणी पंचायत समितीची टुमदार अशी इमारत होईल. त्यासाठी आमचा प्रयत्न असेल, असेही समितीतर्फे सांगण्यात आले.
माजरी व घोडपेठ ग्रामपंचायत येथील संशयित अफरातफर प्रकरणाची चौकशी प्रलंबित असल्याने संबंधितांना समितीने चांगलेच धारेवर धरले.
भद्रावती पंचायत समितीमध्ये सर्व कामांचा आढावा समितीने घेतला. भद्रावती पंचायत समितीमध्ये चांगल्या पद्धतीने कामकाज सुरू आहे, असे समितीतर्फे सांगण्यात आले. पंचायती राज समिती दौऱ्याचे समिती प्रमुख विधान परिषद सदस्य विक्रम काळे, विधानसभा सदस्य अनिल पाटील, कक्ष अधिकारी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय प्रणव नाईक, उपमुख्य अधिकारी जि .प. चंद्रपूर संग्राम शिंदे, शिक्षणाधिकारी प्राथमिक जि. प. दीपेंद्र लोखंडे, लघुलेखक कैलास मेश्राम उपस्थित होते.