चंद्रपूर : सहकारी महिला कर्मचाऱ्यासोबत असभ्य वर्तन आणि अश्लील एसएमएस पाठवून त्रास देण्याच्या प्रकरणात पीडित महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून चंद्रपूर पंचायत समितीच्या दोन कर्मचाऱ्यांना रामनगर पोलिसांनी गुरुवारी अटक केली. त्यांच्यावर विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दिनेश कोडापे आणि दत्तू घोडे अशी अटकेतील कर्मचाऱ्यांची नावे आहेत. पीडित महिलासुद्धा चंद्रपूर पंचायत समितीमध्ये काही महिन्यांपूर्वी वरिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत होती.आरोपी दिनेश कोडापे हा पं.स. मध्ये वरिष्ठ सहाय्यक तर दत्तू घोडे हा संगणक परिचालक म्हणून काम करीत आहे. पीडित महिला विधवा असून आरोपीसह ती पंचायत समितीमध्ये काम करीत असताना आरोपी कोडापेने तिला त्रास देणे सुरू केले. पीडित महिला विधवा असल्याचा लाभ घेत तिच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करणे, अश्लील एसएमएस करणे, धमकी देणे असे प्रकार सुरू केले. त्यांनी आरोपीच्या या कृत्याची माहिती पंचायत समितीचे अधिकारी, पदाधिकारी यांना दिली. दोघेही आरोपी विवाहित आहेत. त्यांच्या कुटुंबीयाकडेसुद्धा फिर्यादी महिलेने अनेकदा सांगून आरोपींना समजाविण्याचा प्रयत्न केला. कार्यालयात अनेकदा आरोपींसोबत पीडित महिलेचे याच कारणावरून भांडणसुद्धा झाले. असे असतानाही आरोपींनी फिर्यादी महिलेला त्रास देणे सुरूच ठेवले. अखेरीस आरोपींचा त्रास असह्य झाल्याने पीडित महिलेने गुरुवारी पोलिसात तक्रार दिली. (शहर प्रतिनिधी)
पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांना अटक
By admin | Published: June 28, 2014 2:28 AM