बल्लारपूर : कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी शहरात सध्या दोनच कोविड सेंटरची व्यवस्था आहे, तर आणखी व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती आहे. यात भर पडावी यासाठी स्थानिक आप पक्षाने बिल्ट पेपर मिलने त्यांच्या मंगल कार्यालयात कोविड सेंटर सुरू करून ५० बेडची व्यवस्था करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
बल्लारपूर शहराचे आप पक्षाचे संयोजक रवी पुप्पलवार यांनी जिल्हा विधि सल्लागार ॲड. किशोर पुसलवार यांच्या मार्गदर्शनाखाली या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. निवेदनात म्हटले आहे की, देशात कोरोनाचे संकट वाढतच आहे. जिल्ह्यात बेडची संख्या कमी पडत आहे. अशात बल्लारपूरच्या पेशंटला भरतीसाठी बाहेर जावे लागत आहे. पेपरमिलकडे प्रशस्त मंगल कार्यालयात जागा आहे व यात ५० बेडची व्यवस्था होऊ शकते. यामुळे मिलने या जनहिताच्या कामात पुढाकार घ्यावा. निवेदन देताना आपचे आसिफ हुसेन, शमशेरसिंग चौहान व इतर सदस्यांची उपस्थिती होती.