चंद्रपूर : पहिलीपासून आठव्या वर्गापर्यंत देण्यात येणारी मोफत पाठ्यपुस्तक योजना, पुढील शिक्षणासाठी बंद करण्यात आल्याने गरीब पालकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. दहाव्या वर्गानंतर आपला पाल्य हुशार असला तरी त्यांच्या शैक्षणिक साहित्याची किंमत भरमसाठ वाढल्याने पालक वर्ग हैराण झाला असून अनेक गरीबांची मुले शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.शासनाने शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी सक्तीचे शिक्षण कायदा लागू केला. मात्र या सर्व महागड्या शिक्षण प्रणालीमुळे भविष्यातील गरीब घरचा मुलगा शिक्षण घेणार की नाही, हा प्रश्न उभा आहे. मागील वर्षीच्या तुलनेत १० ते २० टक्के शिक्षण साहित्याची किंमती वाढल्यामुळे वाढत्या महागाईवर पालकांची चिंता वाढली आहे.शासनाच्या सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकाचे वितरण करण्यात येत आहे. यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शासनाकडे अधिक पुस्तकाची मागणी करून आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके मिळेल. मात्र पुढे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे काय? त्यांना बाजारातून महागडी पुस्तके खरेदी करावी लागत आहे. याशिवाय वह्या, पेन, पेन्सीलसारखे शैक्षणिक साहित्यही दिवसेंदिवस महाग होत चालल्याने शिक्षण घेणे गरिबांसाठी कठीण होत चालले आहे.प्रत्येक पालकांना आपला मुलगा शिकून मोठा व्हावा उच्च शिखर गाठावे, आपले नाव गावाचे नाव मोठे करावे असे वाटते. स्वाभाविक आहे. त्यासाठी स्वत: काबाडकष्ट करून प्रत्येक पालक आपला मुलगा चांगल्या शाळेत पाठवतो. यातून गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळा डबघाईस आल्या आहेत. शहरी शाळा बालकांनी फुलू लागल्या. शहरी शाळेतील कॉन्व्हेंटची गाडी (स्कुलबस) गावात दाखल होताच युनिफॉर्म घालून छोटी मुले अगदी शिस्तीत गाडीत बसून शाळेत जाताना पालकांना होणारा आनंद गगणात मावेनासा असतो.पुढील शिक्षणासाठी शैक्षणिक साहित्य वही १० इ. ची १५ रु. झाली. १५ चे रजिस्टर ३० रु., चित्रकला वही २० ते ३० रु., कंपासपेटी ५० ते १०० रु. पर्यंत, दप्तर २०० ते ८०० रु. पर्यंत, पाण्याची बाटल २० ते ५० रु., जेवनाचा डब्बा ५० ते २०० रु. ही झाली छोट्या मुलांची खरेदी.वर्ग १० वीच्या समोर शिक्षण घेताना सायन्सचे शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांना २०० रु. रूम किराया, ३० हजार रु. शिकवणी, १००० पुस्तके, ८०० रु. बुक पेन, २००० ड्रेस, इतर सर्व खर्च मिळून वर्षाला ६० ते ८० हजार रु. एकाला खर्च करावे लागतात. तेव्हा गरीब विद्यार्थी कसा शिकणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (शहर प्रतिनिधी)
वधारलेल्या शैक्षणिक साहित्यांमुळे पालक हैराण
By admin | Published: July 21, 2014 12:07 AM