चंद्रपूर : मागील दोन महिन्यांपासून एसटी सेवा बस बंद असल्याने प्रवासी त्रस्त आहेत. त्यातच ट्रक चालक आपले वाहन विसापूर फाट्यावरील बस थांब्यावर अगदी लागून पार्क करतात. त्यामुळे प्रवासी वाहनांना प्रवासी दिसत नसल्याने कोणतेच वाहन बस थांब्यावर थांबत नाही. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.
विसापूर येथील नागरिक, विद्यार्थी, प्रवाशांना काही ना काही कामानिमित्त चंद्रपूर किंवा बल्लारपूर शहरात जावे लागते, परंतु विलीनीकरण करण्याच्या मागणीकरिता एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असल्याने, त्यांना केवळ खासगी वाहनाचा आधार आहे. प्रवाशांना वाहनाची प्रतीक्षा करण्यासाठी बसथांबा निवाऱ्याचा आसरा घ्यावा लागतो, परंतु अनेक दिवसांपासून ट्रक चालक आपले वाहन बस थांब्याच्या जागेसमोर पार्क करतात. परिणामी, प्रवासी वाहनांना बस थांब्यावर उभा असलेला प्रवासी दिसत नाही. परिणामी, ते वाहन चालक सरळ निघून जातात. त्यामुळे प्रवाशांना तेथेच ताटकळत राहावे लागते. यामुळे त्यांना कमालीच्या त्रास सहन करावा लागत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन बस थांब्याच्या परिसरात वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
बाजूलाच आहे टोल नाका
बस थांब्याच्या बाजूलाच टोल नाका आहे. त्यामु्ळे ते आपल्या परिसरात ट्रक पार्क करू देत नाही. परिणामी, हे ट्रक चालक बस थांब्याच्या समोरच ट्रक पार्क करतात. मात्र, प्रवाशांना उभे राहण्यासाठी तेथे जागाच नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. याची जाण ठेऊन टोल नाकाधारकांनी या थांब्यावर पार्क होत असलेल्या ट्रक चालकांना गाड्या उभ्या ठेवण्यापासून बंदी घालवी, तसेच दुसऱ्या जागेची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.