मूल : खरीप हंगामात पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांना सहभाग घेण्यासाठी अंतिम मुदत १५ जुलै असून तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन तहसीलदार डॉ.रवींद्र होळी यांनी केले आहे.
पीक विमा योजनेसाठी २०२१ या हंगामाच्या नोंदणीसाठी राष्ट्रीय विमा संकेतस्थळ कार्यान्वित झालेले आहे. तालुक्यातील अधिसूचित क्षेत्रातील पिकासाठी पीक विमा क्षेत्र घटक धरून राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. जिल्ह्यात खरीप हंगामासाठी भारती ऍक्सा जनरल एन्शुरन्स कं. लि. या विमा कंपनीची नेमणूक केली आहे. हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, खरीप हंगामातील अपुरा पाऊस, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे केवळ अधिसूचित क्षेत्रात सर्वसाधारण क्षेत्राच्या ७५ टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी, लावणी न झाल्यास विमा संरक्षण, पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, सर्वसाधारण काढणीच्या १५ दिवस आधीपर्यंत पूर, पावसातील खंड, दुष्काळ आदी बाबींमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पादनामध्ये सरासरी उत्पादनाच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर अधिसूचित क्षेत्रस्तरावर विमा संरक्षण मिळणार आहे. योजनेत समाविष्ट पिके तालुक्यातील खरीप हंगाम २०२१ मध्ये धान (भात), सोयाबीन, तूर पिकांचा समावेश करण्यात आला आहे. प्रतिकूल परिस्थितीत पिकांचे नुकसान टाळून उत्पादनात येणारी घट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक विमा काढावा, असे आवाहन तहसीलदार होळी यांनी केले आहे.