पी. एस. आंबटकर यांचे अनुभव कथन : एज्युकेशन आॅयकान आॅफ महाराष्ट्रचंद्रपूर : ‘लोकमत’ने पुणे येथे आयोजित केलेल्या ‘एज्युकेशन आॅयकान आॅफ महाराष्ट्र’ या भव्यदिव्य कार्यक्रमातील सहभागाने आपण अतिशय भारावून गेलो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रातील समस्यांवर चर्चा झाली. त्याचे निश्चितपणे चांगले परिणाम दिसून येतील, अशा अपेक्षा महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पी.एस.आंबटकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केल्या. पी.एस. आंबटकर यांच्या महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेअंतर्गत चंद्रपूरसह यवतमाळ जिल्ह्यातही विद्यादानाचे काम चालते. चंद्रपुरात सोमय्या पॉलिटेक्नीक, मॅक्रुन स्टुडंट अकॅडमी (सीबीएई), पॅरामाऊंट कॉन्व्हेंट, भद्रावती येथील मॅक्रुन स्टुडंट अकॅडमी, यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे मॅक्रुन स्टुडंट अकॅडमी आदी शाळा व महाविद्यालय कार्यान्वित आहे. जवळपास सात हजार विद्यार्थी या शाळांमधून शिक्षण घेत असून ४०० पेक्षा अधिक शिक्षक व प्राध्यापक या संस्थेमध्ये कार्यरत आहेत. सोमय्या पॉलिटेक्नीकमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बससेवा मोफत देण्यात असून आठ बसेस विद्यार्थ्यांची ने-आण करीत आहे. पुन्हा सहा बसेस सुरू करण्यात येणार आहे. गरजू विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून स्व.सावित्रीबाई आंबटकर फाऊंडेशनतर्फे गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळातर्फे चालविण्यात येणाऱ्या शाळा व महाविद्यालयांमध्ये ई-लर्निंग सुविधा आहे. ही शिक्षण संस्था प्रगती पथावर असता लोकमतने आयोजित केलेल्या ‘एज्युकेशन आॅयकान आॅफ महाराष्ट्र’ या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली, ही माझ्यासाठी फार मोलाची गोष्ट असल्याचेही पी.एस.आंबटकर यांनी सांगितले. ‘एज्युकेशन आॅयकान आॅफ महाराष्ट्र’ या कार्यक्रमाबाबत त्यांना काय वाटले, हे जाणून घेण्यासाठी लोकमतने त्यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी कार्यक्रमाच्या सादरीकरणाबाबत मनापासून त्यांनी कौतुक केले. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी आणि राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांच्यासमक्षच शैक्षणिक क्षेत्रातील समस्या आणि उणिवांवर चर्चा करण्यात आली. त्यातून कार्यक्रमाला एक वेगळाच रंग चढला. हा केवळ सत्कार आणि सन्मानाचा कार्यक्रम नव्हता तर येथे विदर्भात शैक्षणिक कार्य करणाऱ्या खासगी संस्थांच्या संचालकांना आपल्या समस्या मांडता आल्या. खासगी शाळा आणि महाविद्यालयांना यापुढे प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन यावेळी ना.विनोद तावडे यांनी दिल्याचे पी.एस.आंबटकर यांनी सांगितले. या कार्यक्रमात होतकरू विद्यार्थ्यांना शासनाच्या समाजकल्याण विभागामार्फत शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र या शिष्यवृत्ती वाटपात शासनाकडून अनियमितता होत आहे. याबाबीकडेही शिक्षणमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. दोन वर्षांपासून राज्य शासनाने शिष्यवृत्तीचे पैसे दिले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे, असे या कार्यक्रमात अनेक शैक्षणिक संस्थाचालकांनी सांगितल्याची माहिती आंबटकर यांनी दिली. ‘लोकमत’चे चेअरमन विजय दर्डा हे दिवसभर कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनीही विदर्भातील खासगी शिक्षण संस्थेच्या सर्व समस्या ऐकून घेतल्या. त्या सुटतील, अशी आशा आंबटकर यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
लोकमतच्या अनोख्या सोहळ्यातील सहभागाने भारावलो
By admin | Published: June 08, 2016 12:47 AM