मागील एक वर्षापासून टाळेबंदीमुळे खासगी प्रवासी वाहन व्यवसाय डबघाईस आला. त्यामळे त्यांनी भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष इम्रान खान यांची भेट घेतली. इम्रान खान यांनी पुढाकार घेऊन लगेच माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांना खासगी प्रवासी वाहन चालक-मालकांच्या समस्या समजावून सांगितल्या. तसेच या खासगी वाहन चालक-मालकांनी आ. मुनगंटीवार यांना एक निवेदन सादर केले. या निवेदनाची आ. मुनगंटीवार यांनी तातडीने दखल घेऊन राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब आणि परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांना खासगी प्रवासी वाहन चालक-मालकांच्या समस्या अवगत करून त्यांच्या मागण्या मान्य करण्याची विनंती केली. तसेच तातडीने ऑनलाइन बैठकीचे आयोजन करून परिवहन आयुक्त ढाकणे यांच्यासोबत चर्चा केली. याशिवाय केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, भूतल परिवहन मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तातडीने पत्र पाठवून खासगी प्रवासी वाहन चालक-मालकांना आर्थिक साहाय्य, करमाफी, विमा मुदतवाढ, बॅँक हप्त्यांना बिनाव्याजी मुदतवाढ, आदी मागण्या पूर्ण करण्याची विनंती केली.
परिवहन आयुक्त ढाकणे यांनी ऑनलाइन बैठकीत पूर्ण वर्षाचा कर माफ करण्याबाबत आपण त्वरित शासनाला प्रस्ताव सादर करू, असे आश्वासन दिले. शाळा सुरूच न झाल्यामुळे स्कूल बस आणि स्कूल व्हॅन यांच्यावरील कर माफ करण्याबाबत आपण प्रस्ताव पाठविला आहे, अशीही माहिती ढाकणे यांनी यावेळी दिली.