चंद्रपूर : राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या केबिनला अचानक आग लागल्याने, प्रवाशांनी खिडकीतून उड्या मारल्याची खळबळजनक घटना सोमवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास सिंदेवाही जुन्या बस स्थानकावर घडली. आगीने रौद्र रूप धारण करण्यापूर्वीच क्षणाचाही विलंब न करता आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही.
ब्रह्मपुरी आगाराची चंद्रपूरकडे जाणारी एमएच ४० एक्यू ६०६८ क्रमांकाची बस सिंदेवाही येथील जुन्या जुना बस स्थानक परिसरात दुपारी २.३० वाजताच्या सुमारास थांबली. या बसमध्ये प्रवाशी खचाखच भरून होते. त्यामध्ये महिला प्रवाशांची संख्या सर्वाधिक होती. बसमधील बॅटरीच्या वायरिंगने अचानक पेट घेतल्यामुळे केबिनला आग लागली. केबिनमधून आगीचा धूर निघाला होता. हे दृश्य बस स्थानकावर प्रवाशी व चालक वाहकांना दिसल्याने त्यांनी आरडाओरडा करून आतील प्रवाशांना सतर्क केले. लगेच पाण्याच्या बादल्या घेऊन आग विझविण्यास धाव घेतली. तोपर्यंत बसमधील प्रवाशांना याची काही कल्पना नव्हती. केबिनला आग लागल्याचे कळताच, आतील प्रवाशांनी जीवाच्या आकांताने मागील खिडकीतून उड्या मारून बाहेर निघाले. चालक, वाहक, पोलिस व प्रवाशांच्या मदतीला नागरिकांनी आग विझविण्यास सतर्कता बाळगल्याने, रौद्ररूप धारण करण्यापूर्वीच आग आटोक्यात आली. त्यानंतर, एसटी महामंडळाच्या वरिष्ठांनी सर्व प्रवाशांना सुखरूप ठिकाणी राहण्याच्या सूचना करून बसची पाहणी केली. आगीची घटना अगदी वर्दळीच्या मार्गावर घडल्याने, काही तास वाहतूक खोळंबली होती.
लॉक तोडले नसते तर...
बस केबिनमधील बॅटरीच्या वायरिंगने पेट घेतल्याचे लक्षात येताच, तांत्रिक ज्ञान असणारे बबलू सय्यद यांनी बॅटरीची वायर व लॉक लगेच तोडून टाकले. त्यामुळे आग आटोक्यात आली. सय्यद यांनी ही हिंमत दाखविली नसती, तर मोठा अनर्थ झाला असता. प्रवाशांच्या मदतीला नागरिक व पोलिस निरीक्षक तुषार चव्हाण यांनी पथकांच्या मदतीने बसमधील प्रवाशांना नवीन बस स्थानकावर पोहोचविण्यात आले. दुर्घटनाग्रस्त जुन्या बस स्थानकावर बाजूला ठेवण्यात आली.
दोन वर्षांपूर्वीची कटू आठवण
सिंदेवाही शहरातील जुन्या बस स्थानकात दोन वर्षांपूर्वी एका बसला आग लागली होती. त्याच जुन्या बस स्थानकातील बसच्या केबिनला आग लागलेली ही दुसरी घटना आहे. अनेक बसेसची अवस्था वाईट आहे. मात्र, त्याच बसमधून प्रवासी वाहतूक केली जात आहे. त्यामुळेच अशा घटना घडत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.