लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वच शाळांच्या इयत्ता १ ते ४ व शहरी भागात १ ते ७ वीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी मिळाली. मात्र, वर्गात एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे बैठक व्यवस्था असावी, असे मार्गदर्शक तत्त्वात नमूद केल्याने गुरुवारी शाळांचा दुसरा दिवस गोंधळात गेला. याच गोंधळामुळे काही शाळांमध्ये तासिकाच झाल्या नसल्याचे समजते. जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार शाळा समितीने शाळा सुरू करण्यापूर्वी दिलेल्या बाबींवर चर्चा करणे आवश्यक आहे. समितीने शाळा सुरू करण्यापूर्वी संबंधित शहरात, गावात कोविडचा प्रादुर्भाव कमी झालेला असावा. सर्व शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये. कोविडसंबंधी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, जास्त विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रांमध्ये, एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये सहा फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त १५ ते २० विद्यार्थी, सतत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर, लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना वैद्यकीय अधिकारी अथवा नजीकच्या आरोग्य केंद्रांमध्ये पाठवावे. विद्यार्थी कोविडग्रस्त झाल्याचे आढळल्यास शाळा बंद करून शाळा निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना केल्या आहेत.
मुख्याध्यापक संभ्रमात- शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोविडसाठीची ४८ तासांपूर्वीची आरटीपीसीआर चाचणी करावी. प्रयोगशाळेने दिलेले प्रमाणपत्र शाळा व्यवस्थापनास सादर करावे. - शाळा सुरू केल्यानंतर मुलांना टप्पाटप्प्यांत वर्गात बोलविण्याच्या सूचना गुरुवारी जारी केल्या. शुक्रवारी पहिल्या दिवशी सरसकट सर्वच मुलांना वर्गात बोलाविले होते. - नवीन सूचनेमुळे मुख्याध्यापक संभ्रमात सापडले आहेत.
शाळा समिती व पालकांची भूमिका महत्त्वाची विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी पालकांची संमती आवश्यक असेल. जि. प. शाळांनी याबाबत शाळा व्यवस्थापन समितीने पालकांशी चर्चा करावी, असेही सुचविण्यात आले. शुक्रवारी बऱ्याच शाळांनी समितीची चर्चा करून शाळा सुरू केली होती. मात्र, पहिल्या दिवशी जिल्हास्तरावरील मार्गदर्शक सूचना जारी झाले नव्हते. आज प्रशासनाने याबाबत सूचित केले. त्यामुळे स्थानिक स्थिती लक्षात घेऊन आदेशापर्यंत वर्ग सुरू ठेवण्यास शाळा समिती व पालकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.