चंद्रपूर (सावली) : पाथरी पोलिस स्टेशनला नव्यानेच रुजू झालेल्या पोलिस निरीक्षक संगिता हेलोंडे यांच्या मार्गदर्शनात होळी व धुलिवंदनानिमित्त अवैध दारुविक्रेत्यांविरुद्ध विशेष मोहीम राबवून २६ मार्च रोजी ठाण्याच्या हद्दीतील निफ्रंद्रा येथे कारवाई करुन एक लाख २० हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन दोघांना अटक केली आहे. आकाश विनोद भोयर (२६), सुरज वसंत मस्के (२५) दोघेही रा. निफ्रंदा ता. सावली असे अटकेतील आरोपींचे नाव आहे.
मागील २० दिवसांपूर्वी पाथरी पोलिस स्टेशनची सुत्रे संगिता हेलोंडे यांनी स्विकारली आहे. त्यांनी पदभार स्विकारताच अवैध व्यावसायिकांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान २६ मार्च रोजी पाथरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील निफ्रंदा येथे गुप्त माहितीवरुन धाड टाकून सुरज मस्के व आकाश भोयर यांच्यावर गुन्हा दाखल करुन नऊ पेटी देशी दारु, एक पेटी रॉयल स्टॅग, व एक दुचाकी असा एक लाख २० हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यासोबतच त्यांनी अवैध रेती तस्करी यासह विविध अवैध व्यावसायिकांवर कारवाईचा धडाका सुरु केल्याने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.
होळी व धुलिवंदन शांततेतहोळी व धुलिवंदनाच्या दिवशी पाथरी पोलिस स्टेशनच्या ठाणेदार संगिता हेलोंडे यांनी ड्रंक ॲण्ड ड्राईव्हविरुद्ध विशेष मोहीम राबवली होती. चौका-चौकात पथक तैनात केले होते. रात्रीपर्यंत शहरात पोलिसांची गस्त होती. त्यामुळे येथील होळी व धुलिवंदनाचा सण शांततेत पार पडला.