नागभीड : नागपूरच्या दाभाडकर यांनी स्वतःचे ऑक्सिजन बेड अन्य गरजवंतास देऊन दाखविलेल्या औदार्याची चर्चा जोरावर असतानाच नागभीडच्या अशोक वारजूकर यांनी काहीसे असेच काम केले आहे. अशोक वारजूकर यांनीही स्वतःचे ऑक्सिजन अन्य गरजवंतास देऊन दाखविलेल्या या औदार्याची नागभीडच्या समाज माध्यमातून चांगलीच चर्चा होत आहे.
नागभीड येथील एका मेडिकल स्टोअरचे संचालक असलेले अशोक वारजूकर यांना अचानक श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यामुळे कोरोनाच्या भीतीने त्यांनी उपचारासाठी प्रथम ब्रह्मपुरी आणि नंतर नागपूर गाठले. नागपूरच्या सिटी केअर हॉस्पिटलमध्ये ते दाखल झाले. तपासणीत त्यांची ऑक्सिजन लेवल ८५ आढळल्याने त्यांना ऑक्सिजन लावण्यात आले. मात्र, त्याचवेळी बाजूलाच अन्य एक रुग्ण होते. त्या रुग्णाची ऑक्सिजन लेवल ६५ होती व त्या रुग्णाला ऑक्सिजनची अत्यंत आवश्यकता होती. मात्र, हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची अन्य व्यवस्था नव्हती. डॉक्टरांसमोरही कोणताच पर्याय नव्हता. ही गोष्ट अशोक वारजूकर यांना समजली. त्यांनी लगेच निर्णय घेऊन आपला ऑक्सिजन बाजूच्या रुग्णाला दिला. आता दोन्ही रुग्ण सुखरूप आहेत.