चंद्रपूर : महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या माध्यमातून जिल्हा सामान्य रुग्णालयात मदत व सल्ला केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्राच्या माध्यमातून जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णांच्या समस्या सोडविण्यात येणार आहेत.
केंद्राचे उद्घाटन खासदार बाळू धानोरकर यांनी केले. महिला काँग्रेसच्या प्रदेश सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर यांच्या नेतृत्वात महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा चित्रा डांगे यांच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. दर गुरुवारी महिला काँग्रेसचे पदाधिकारी जिल्हा सामान्य रुग्णालयातील या केंद्रात दुपारी १२ ते २ या वेळेला उपस्थित राहून सामान्य रुग्णालयात नागरिकांच्या अडचणी सोडविणार आहेत.
खासदार बाळू धानोरकर यांनी लाल फीत कापून या केंद्राचे उद्घाटन केले. या केंद्राच्या माध्यमातून रुग्णालयातील सर्व समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगून पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या माध्यमातून देखील हे रुग्णालय सर्वसोयीनींयुक्त करण्यात येईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाला प्रदेश सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर, जिल्हाध्यक्षा चित्रा ताई डांगे, अल्पसंख्याकचे जिल्हाध्यक्ष सोहेल रजा, अनुसूचित सेलच्या महिला शहर अध्यक्षा शालिनी भगत, मतिन कुरेशी, हाजी अली, सुनीता धोटे, शीतल काटकर, स्वाती त्रिवेदी, हर्षा चांदेकर, लता बारापात्रे, मुन्नी मुमताज शेख, चंदा वैरागडे, शाहीन खान, वंदना खेडकर, बबलू कुरेशी यांची उपस्थिती होती.