अनेकांची आर.टी.पी.सी.आर. चाचणी नाही
विसापूर : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे; दुसऱ्या लाटेने मनुष्याला अक्षरशः हतबल करून सोडले आहे. यामुळे अनेकांनी धास्ती घेऊन स्वतः सीटी स्कॅन करून आपला स्कोअर जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याप्रमाणे डॉक्टरकडून उपचारसुद्धा करून घेत आहे. असे बाधित रुग्ण आर.टी.पी.सी.आर. चाचणी करत नसल्यामुळे आरोग्य प्रशासनाकडे किती रुग्ण गावात पॉझिटिव्ह आहेत, याचा निश्चित आकडा नाही; परंतु सध्याची परिस्थिती पाहता घराघरांमध्ये रुग्ण दिसून येत आहेत.
नागरिक कोणताही विचार न करता स्वतःच्या मर्जीने सीटी स्कॅन करून स्वतःला धोका निर्माण करीत आहेत. हे सर्व डॉक्टरच्या सल्ल्यानेच केले पाहिजे, याचा थोडासुद्धा विचार करत नाही आहे. बरेच नागरिक होम आयसोलेशन घेऊन डॉक्टरच्या सल्ल्याने घरीच उपचार घेत आहेत; परंतु यापैकी काही रुग्ण गावात मोकाट फिरत असल्याने कोरोनाचा उद्रेक होण्याची भीती गावात निर्माण झालेली आहे. ग्राम प्रशासन व आरोग्य प्रशासनाने संयुक्तरीत्या मोहीम राबवून चंद्रपूर-बल्लारपूर शहराच्या धर्तीवर गावात विनाकारण फिरणाऱ्यांची अँटिजन चाचणी केली पाहिजे, अशी मागणी आहे.
कोट
आरोग्य प्रशासनाकडे १ मे ते आजपर्यंत ८९ रुग्ण पॉझिटिव्ह निघाल्याची नोंद आहे. शिवाय कोरोनाबाधित होण्याचा वेग वाढत असल्यामुळे नागरिक स्वतःच आता कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात देऊ लागले आहे. बरेचसे संशयित रुग्ण गावात मोकाट फिरत असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वरिष्ठांकडे तक्रार केली आहे.
- डॉ. श्रावणी कोडेलवार, आरोग्य अधिकारी
प्राथमिक आरोग्य केंद्र, विसापूर.